वाळू उपशामुळे बंधाऱ्याला धोका
By admin | Published: December 30, 2016 04:33 AM2016-12-30T04:33:29+5:302016-12-30T04:33:29+5:30
चिखली (ता. इंदापूर) येथे परिसरातील वाळूतस्करांनी नदीचे पात्र पोखरलेले आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडल्याने येथील बंधाऱ्यास धोका पोहोचला आहे.
वालचंदनगर : चिखली (ता. इंदापूर) येथे परिसरातील वाळूतस्करांनी नदीचे पात्र पोखरलेले आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडल्याने येथील बंधाऱ्यास धोका पोहोचला आहे. तसेच, पात्रातील मोठ्या खड्ड्यांमुळे पाण्याचा प्रवाहही बदलत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खचत आहेत. त्यामुळे परिसरात होत असणाऱ्या अवैध वाळूउपशावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
तीन जिल्ह्यांच्या सीमा समजल्या जाणाऱ्या नीरा नदीवर जमिनी ओलिताखाली येण्यासाठी व पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी नदीच्या पात्रात आठ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. परंतु, या परिसरात बेमाप अवैध वाळूउपसा होत आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी बंधाऱ्याचा पाया खचू लागला आहे. वेळीच येथील अवध्ौ वाळूउपशावर कारवाई केली नाही तर बंधारा कोसळण्याचीही भीती व्यक्त होत आहे. नदीत खड्डेच खड्डे असल्याने नदीच्या प्रवाहात बदल होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खचून नदीच्या पात्रात भर पडत आहे. वाळूतस्करी चालू राहिल्यास नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी कमी होणार आहेत व कोल्हापुरी बंधारा ढासळणार आहे. त्यामुळे वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. (वार्ताहर)