नवजात अर्भकाचा मृत्यू गंभीर भाजल्यामुळेच, शवविच्छेदनामध्ये निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 05:08 AM2017-09-29T05:08:00+5:302017-09-29T05:09:58+5:30
इन्क्युबेटरने पेट घेतल्याने गंभीररित्या भाजलेल्या नवजात अर्भकाचा बुधवारी मध्यरात्री ससून रुग्णालयात मृत्यू झाला. भाजल्यामुळे झालेल्या गंभीर जखमांमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनामध्ये निष्पन्न झाले.
पुणे : इन्क्युबेटरने पेट घेतल्याने गंभीररित्या भाजलेल्या नवजात अर्भकाचा बुधवारी मध्यरात्री ससून रुग्णालयात मृत्यू झाला. भाजल्यामुळे झालेल्या गंभीर जखमांमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनामध्ये निष्पन्न झाले. बुधवार पेठेतील वात्सल्य हॉस्पिटलमधील डॉक्टर व स्टाफच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्यामुळे डॉक्टरसह संबंधित कर्मचा-यांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. गौरव चोपडे असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी विजेंद्र विलास कदम
(वय ३५, रा. शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्याला लेबररूमध्ये काचेच्या पेटीत ठेवण्यात आले होते. पेटीमध्ये बाळाला आॅक्सिजन ठेवून मास्क लावले होते. सर्वजण लेबररूमच्या बाहेर आल्यानंतर बाळ ज्या काचेच्या पेटीमध्ये ठेवले होते त्याचा स्फोट होऊन धूर बाहेर आला. हॉस्पिटलमधल्या डॉक्टर आणि कर्मचाºयांनी यंत्रसामग्री हाताळण्यासंबंधी योग्य काळजी न घेता हलगर्जीपणा केल्यामुळे बाळाला गंभीर दुखापत होऊन बाळ ८० ते ९० टक्के भाजले आहे. त्यामुळे डॉक्टरसह स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक ए. जी. मराठे यांनी सांगितले.
बुधवारी रात्री आठ वाजता गंभीररित्या भाजलेल्या नवजात अर्भकाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्भकाची प्रकृती खूपच गंभीर असल्याने बुधवारी रात्री १ वाजता बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनमध्ये गंभीर भाजल्यामुळेच हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
- डॉ. अजय तावरे,
अधीक्षक ससून रुग्णालय