शिवशाहीमुळे एसटीची ‘दिवाळी’, दिवाळीत प्रवाशांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:05 AM2018-11-14T02:05:33+5:302018-11-14T02:06:12+5:30

प्रवाशांची मिळाली पसंती : खासगी ट्रॅव्हल्सला दिली टक्कर, प्रवासी वाढले

 Due to Shivshahi, ST's 'Diwali', the choice of passengers in Diwali | शिवशाहीमुळे एसटीची ‘दिवाळी’, दिवाळीत प्रवाशांची पसंती

शिवशाहीमुळे एसटीची ‘दिवाळी’, दिवाळीत प्रवाशांची पसंती

Next

पुणे : दिवाळीत दरवर्षी खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देणाऱ्या अनेक प्रवाशांची पावले यंदा एस.टी. महामंडळाच्या शिवशाहीकडे वळली. त्यामुळे शिवशाहीमुळे एसटीची दिवाळी झाल्याचे चित्र आहे. एसटीच्या पुणे विभागाचे संचलन कमी होऊनही यावर्षी उत्पन्नात जवळपास ४१ लाखांहून अधिक वाढ झाली आहे. शिवशाहीने खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर दिल्याने त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचे ट्रॅव्हल व्यावसायिकांनी मान्य केले.

दिवाळीनिमित्त एसटीकडून दरवर्षी जादा बसचे नियोजन केले जाते. यावर्षी पुणे विभागाने नियमित बसव्यतिरिक्त जवळपास ४५० जादा बस सोडल्या. यावर्षी नियमित बससह जादा बसमध्ये आरामदायी वातानुकूलित शिवशाही बसचा समावेशही होता. मागील वर्षी या बस महामंडळामध्ये दाखल झाल्या असल्या तरी दिवाळीमध्ये कर्मचाºयांच्या संपामुळे संचलन होऊ शकले नाही. त्यानंतर यंदा दिवाळीपर्यंत दिवसेंदिवस शिवशाहीची मागणी वाढत गेली. दिवाळीतही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागाला दि. १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे ७ कोटी ५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये शिवशाहीतून मिळालेल्या उत्पन्नाचा वाटा १ कोटीहून अधिक आहे. पुणे विभागात ८५ शिवशाही बस असून त्यामध्ये ८३ बस आसनी तर दोन बस शयनयान आहेत.

२०१६मध्ये दिवाळीच्या काळात पुणे विभागाला ७ कोटी १० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यामध्ये यंदा सुमारे ४२ लाख रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यावर्षी २०१६ च्या तुलनेत बसची एकूण धाव कमी झाली आहे. २०१६मध्ये विभागातील बसचे एकूण किलोमीटर २१ लाख ३९ हजार एवढे होते. यावर्षी त्यामध्ये १ कोटी ६४ लाखांनी घट झाली. असे असूनही विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. शिवशाहीला मिळालेली पसंती तसेच जादा गाड्यांच्या नियोजनामुळे यंदा प्रवासी संख्येत वाढ झाल्याने उत्पन्नही वाढले आहे. दि. ६ नोव्हेंबरनंतरही एसटीला मोठी गर्दी आहे. त्यामुळे एकूण दिवाळीच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे. तसेच यावर्षी पहिल्यांदाच मार्गावरील विविध थांब्यांपासूनही आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासगी ट्रॅव्हल्सला फटका

पुणे जिल्ह्यात ६०० ते ७०० ट्रॅव्हल्स आहेत. दिवाळीच्या काळात प्रत्येक गाडीच्या सरासरी ३ ते ५ फेºया होतात. यंदाची उलाढाल ४ ते ५ कोटींपर्यंत झाली असण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कर्मचारी संपामुळे एसटीची सेवा बंद होती. यावर्षी एसटीने जादा गाड्यांचे नियोजन तसेच शिवशाहीने उत्पन्नावर परिणाम झाला. शासनाने एसटीच्या भाड्याच्या दीड पट भाडे आकारण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे भाडे वाढविण्यात आले नाही. यंदा प्रवाशांची संख्याही कमी होती. इंधन दरवाढ व महागाईचाही परिणाम झाला.
- बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष,
पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस ओनर्स असोसिएशन

पुणे विभागाचे १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीतील उत्पन्न
वर्ष उत्पन्न एकूण धाव (कि.मी.)
२०१६ ७ कोटी १० लाख १९ लाख ७५ हजार
२०१८ ७ कोटी ५२ लाख २१ लाख ३९ हजार

शिवशाहीने यंदा खºयाअर्थाने एसटीची दिवाळी केली आहे. नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, अकोला यांसह खासगी ट्रॅव्हल्सला अधिक मागणी असलेल्या सर्वच मार्गांवर शिवशाहीला अधिक पसंती मिळाली. सर्व शिवशाही गाड्यांचे आरक्षण दि. ६ नोव्हेंबरपर्यंत फुल्ल होते. तसेच भाऊबीजेपर्यंत परतीच्या प्रवासाचे आगाऊ आरक्षणही फुल्ल झाले होते. आरामदायी सेवेमुळे प्रवाशांनी शिवशाहीला अधिक पसंती दिली.
- यामिनी जोशी,
वाहतूक नियंत्रक, पुणे विभाग, एसटी महामंडळ

 

Web Title:  Due to Shivshahi, ST's 'Diwali', the choice of passengers in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.