यवतला शॉर्टसर्किटमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या कंपनीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 07:29 PM2018-08-22T19:29:29+5:302018-08-22T19:35:40+5:30
दौंड तालुक्यातील सहजपुर व नांदूर पट्ट्यात मागील अनेक वर्षांपासून औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत.
यवत: नांदूर येथील वैष्णवी देवी डेअरी प्रॉडक्ट लि.कंपनीच्या गोदामाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून गोदामातील मालाचे नुकसान झाले. या आगीत जीवितहानी झालेली नाही. परंतु. कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे. बुधवारी ( दि. २२आॅगस्ट) दुपारी कंपनीमधील गोदामाला आग लागल्याचे कामगारांच्या लक्षात आले. यावेळी काही वेळातच गोदामातून धुराचे लोट बाहेर येण्यास सुरुवात झाली. सदर गोदामात तयार तुप,पुठ्ठे व पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले होते. यामुळे थोड्याच वेळात आग वेगात सर्व गोदामात पसरली. मात्र, आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीच्या प्रशासनाकडून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. हडपसर येथून अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.यवत पोलीस देखील घटनास्थळी आले होते. मात्र आगीते नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नव्हती.
दौंड तालुक्यातील सहजपुर व नांदूर पट्ट्यात मागील अनेक वर्षांपासून औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. सद्य परिस्थितीत सुमारे १८ लहान मोठ्या कंपन्या या भागात सुरू आहेत. लहान एमआयडीसी येथे सुरू झाल्यानंतर कंपन्यांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास आवश्यक सोयीसुविधा मात्र उपलब्ध झालेल्या नाहीत.या भागातील कोठे आग लागल्यास थेट पुण्यातून अग्निशामक दलाची मदत घ्यावी लागते.आज घडलेल्या घटनेत आगीने तीव्र स्वरूप धारण केलेले नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. परंतु, यापुढील काळात या भागात आपत्कालीन सुविधा निर्माण करणे गरजेचे बनले आहे. अनेक कंपन्या येथे असताना साधी अग्निशामक दलाची व्यवस्था नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे कंपन्यांमध्ये काम करणारे शेकडो कामगार व आजूबाजूच्या नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.