सलग सुट्यांमुळे वाहतूककोंडी
By admin | Published: May 4, 2015 03:13 AM2015-05-04T03:13:22+5:302015-05-04T03:13:22+5:30
पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेले लोणावळा शहर सलग सुट्यांमुळे मागील तीन दिवसांपासून पर्यटकांनी गजबजले असून, राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली
लोणावळा : पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेले लोणावळा शहर सलग सुट्यांमुळे मागील तीन दिवसांपासून पर्यटकांनी गजबजले असून, राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे़ महाराष्ट्र दिनाच्या सुटीला जोडून शनिवार व रविवार तसेच बुद्धपौर्णिमेची सुटी आल्याने उष्म्याने हैराण झालेल्या पर्यटकांनी थंड हवेचे ठिकाण म्हणून नावलौकिक असलेल्या लोणावळा शहराकडे धाव घेतली आहे़ शुक्रवारी सकाळपासूनच पर्यटकांच्या वाहनांची लोणावळ्याच्या दिशेने संख्या वाढल्याने द्रुतगती महामार्गावरदेखील काही काळ वाहतूककोंडी झाली होती़
मागील काही दिवसांपासून वातावरणात उष्णतेचा पारा वाढला आहे़ यामुळे हैराण नागरिक थंड हवेच्या ठिकाणी धाव घेत आहेत. लोणावळ्याच्या हवामानातदेखील या वेळी नागरीकरणामुळे उष्णता वाढली असली, तरी सकाळ व सायंकाळच्या सत्रात या परिसरातील थंड हवा व आल्हाददायीपणा पर्यटकांना आजही भुरळ घालत आहे़ यामुळेच की काय, सलग सुट्यांचा मुहूर्त साधत पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे़ बहुतांश पर्यटक हे स्वत:च्या वाहनांमधून येत असल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे़ शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी व अतिरिक्त कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी नेमण्यात आले आहे़ मात्र, वाहनांच्या संख्येपुढे रस्तेच अपुरे पडत असल्याने वाहतूककोंडी कमी होत नव्हती़ बहुतांश पर्यटकांचा ओढा हा लायन्स पॉइंट, अॅम्बी व्हॅली, पवनानगर, वॅक्स म्युझियम या स्थळांकडे सुरू होता़ पर्यटकांच्या संख्येने ही सर्व स्थळे तुडुंब भरली होती़ कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड व राजमाची किल्ला परिसरातदेखील मोठ्या संख्येने पर्यटक गेले होते़ तीन दिवसांच्या कालावधीत चागंला व्यवसाय झाल्याने व्यापारीवर्गात आनंदाचे वातावरण आहे़(वार्ताहर)