रसिकांनी अनुभवले द.मां.चे कथाकथन!
By admin | Published: June 27, 2017 07:59 AM2017-06-27T07:59:18+5:302017-06-27T07:59:18+5:30
‘मूक चित्रपट पंढरपूरला पाहायचो. लढाई असली की तबला, पेटी यावर आवाज काढले जायचे, हे बघण्यात मोठा आनंद होता. प्रभातच्या ‘गुरुदेव दत्त’
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘मूक चित्रपट पंढरपूरला पाहायचो. लढाई असली की तबला, पेटी यावर आवाज काढले जायचे, हे बघण्यात मोठा आनंद होता. प्रभातच्या ‘गुरुदेव दत्त’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात दत्तापुढे गाय, कुत्रे होते. स्टार्ट म्हटले की कुत्रे उठून जायचे. दोन तास हा गोंधळ चालल्यानंतर एक कामगार जिमखान्यावर जाऊन मटण घेऊन आला व त्याने ते कुत्र्याच्या पुढे ठेवले. त्यानंतर कुत्रे उठले नाही आणि शॉट ओके झाला,’ असे एकाहून एक किस्से खुमासदार शैलीत रंगवत द. मा. मिरासदार यांनी रसिकांची संध्याकाळ हसरी केली.
दमांच्या नव्वदीनिमित्त द. मा. मिरासदार प्रतिष्ठान, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्यातर्फे आयोजित मराठी विनोदी चित्रपट महोत्सवाचा समारोप सोमवारी झाला. या वेळी उद्योजक विनित गोयल, मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, अभिनेते रवींद्र मंकणी, आशयचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार उपस्थित होते. या वेळी राजा परांजपे, विश्वास सरपोतदार, दादा कोंडके, स्मिता तळवलकर यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
द. मा. म्हणाले, ‘एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी दिग्दर्शकाशी भांडण झाल्याने अभिनेत्री निघून गेली. लेखकाच्या सल्ल्याने एका डमी अभिनेत्रीला घेण्यात आले. पाठमोरी चालताना तिचा साधूला धक्का लागतो. साधू संतापतो आणि अब तुम कुत्ती बन जाओगी, असा शाप देतो. ती कुत्री होते. आजूबाजूचे लोक क्षमायाचना करतात. म्हणून साधू पुन्हा तिला स्त्री रूपात आणण्यासाठी तयार होतो; पण आता तिचे रूप बदलेल, असे साधू सांगतो आणि दुसऱ्या अभिनेत्रीच्या पदार्पणाने चित्रपट पुढे सरकतो...’
सुप्रिया चित्राव यांनी
सूत्रसंचालन केले.