रस्त्यांवरील बाजारामुळे वाहतूककोंडीत भर
By admin | Published: April 26, 2017 02:55 AM2017-04-26T02:55:42+5:302017-04-26T02:55:42+5:30
येथील आठवडेबाजार रस्त्यावर आल्याने बाजाराच्या दिवशी दिवसभरात अनेक वेळा वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
तळेगाव ढमढेरे : येथील आठवडेबाजार रस्त्यावर आल्याने बाजाराच्या दिवशी दिवसभरात अनेक वेळा वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
तळेगाव ढमढेरे येथील आठवडेबाजारात मोठी उलाढाल होत असते; परंतु शिक्रापूर-न्हावरा रस्ता या आठवडेबाजारातून जात असल्याने अनेक वर्षांपासून आठवडेबाजाराच्या दिवशी वाहतूककोंडीच्या समस्येला वाहनचालकांना सामोरे जावे लागते. बहुतांश व्यापारी रस्त्यालगतच आपल्या पालेभाज्या विकण्यास बसतात; त्यामुळे ग्राहकवर्ग रस्त्यावरच येत असल्याने वाहनचालकांना बाजारातून पुढे जाणे म्हणजे नित्याचीच डोकेदुखी आहे. बाजारातून वाहने चालविणे चालकांनाही धोकादायक आहेच; परंतु ग्राहक व विक्रेते यांनाही सुरक्षित नाही. त्यामुळे आता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे वास्तव आहे. विशेषत: वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यास ग्रामपंचायत प्रशासन अथवा पोलीस दिसत नाहीत. याबाबत ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे यांनी सांगितले, की आठवडेबाजारामधील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने बाजार समितीची स्वतंत्र कमिटी तयार केली असून, लवकरच विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा व स्वतंत्र विभाग निर्माण करून दिला जाणार असल्याने आपोआपच वाहतूककोंडीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. याकामी स्थानिक व्यापाऱ्यांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. बाजाराची करवसुलीदेखील या कमिटीच्या देखरेखीखाली राहणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीत मदत होणार आहे. (वार्ताहर)