कामाच्या ताणामुळेच चालक व्यसनाधीन
By admin | Published: May 14, 2015 04:13 AM2015-05-14T04:13:33+5:302015-05-14T04:13:33+5:30
पुण्यातील अरुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी यामुळे पीएमपी बसचालकांना बस चालविताना मोठ्या दिव्यातून जावे लागते.
पुणे : पुण्यातील अरुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी यामुळे पीएमपी बसचालकांना बस चालविताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. परिणामी कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पीएमपीचे बसचालक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाने बसचालकांना व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर मॉडर्न महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील विलास महाडिक या विद्यार्थ्याने सहायक प्राध्यापक साईराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमपीच्या चालकांविषयी संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. मोकळेपणाने बोलणारे, अबोला धरणारे, तसेच स्वत:च्या कामाप्रती निष्ठा ठेवून काम करणारे अशी वर्गवारी करून महाडिक या विद्यार्थ्याने सुमारे १२० बसचालकांशी संवाद साधला. अनेक चालक कामाचा ताण घालविण्यासाठी तंबाखू, मद्य, सिगारेट यांचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. मद्यपान करणाऱ्या चालकांची टक्केवारी १२.५ असून, सर्वसाधारणपणे मद्य घेणाऱ्यांची टक्केवारी ६६.६७ टक्के तर कधीतरी मद्यपान करणाऱ्यांची टक्केवारी २०.८३ आहे.
संस्थेने युवा संशोधन योजना सुरू केली आहे. पाच वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पांवर ५० विद्यार्थ्यांनी संशोधन केले. त्यातीलच एका प्रकल्पावर महाडिक या विद्यार्थ्याने ‘बसचालकाचे व्यक्तिमत्त्व आणि ताण’ या विषयावर संशोधन केले. पीएमपीमधून दररोज प्रवास करत असल्यामुळे पीएमपीच्या बसचालकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. विलास महाडिक या विद्यार्थ्याने त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत संशोधन प्रकल्प तयार केला असून, लवकरच हा प्रकल्प पीएमपी प्रशासनाला सादर केला जाणार आहे.