थर्माेकोलच्या ताट-वाट्यांमुळे धोका
By admin | Published: April 24, 2017 04:28 AM2017-04-24T04:28:21+5:302017-04-24T04:28:21+5:30
कोणताही सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम असो, सामूहिक जेवणाच्या पंगतीत विशिष्ट झाडांच्या पानाची पत्रावळी आणि पानाचा
पेठ : कोणताही सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम असो, सामूहिक जेवणाच्या पंगतीत विशिष्ट झाडांच्या पानाची पत्रावळी आणि पानाचा द्रोण याला विशेष महत्त्व असायचे. पानाची पत्रावळ ही वरणभात आणि भाजीचा स्वाद द्विगुणीत ठरवीत आले आहेत. म्हणून पंगतीचे जेवण आपसात प्रेम वाढवणारे ठरत आले आहे. परंतु आता ही पंगतीची परंपरा हळूहळू कमी होऊ लागली असून, बुफे पद्धत वाढत चालली आहे. ग्रामीण भागात पंगत आहे परंतु पत्रावळी गायब होताना दिसत आहेत. त्यामुळे पत्रावळीतील भोजनाचा स्वाद आणि द्रोणामध्ये कढी पिण्याचा आनंद पंगतीतून हरवला असल्याचे दिसत आहे.
जुन्या पत्रावळींची जागा आता आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिक, थर्माेकोलच्या ताट आणि वाट्यांनी घेतली आहे. जेवणासाठी प्लॅस्टिकच्या, थर्मोकोलच्या पत्रावळ्या वापरल्या जातात. जेवून वापरून झालेल्या पत्रावळ्या निष्काळजीपणे इतरत्र टाकल्या जातात. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून या पत्रावळ्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम कार्यमालकांनी करणे गरजेचे आहे.
पूर्वीच्या काळी साल वृक्षाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी वापरण्याची प्रथा होती. परंतु काळाच्या ओघात आधुनिक पद्धतीच्या प्लॅस्टिकच्या, थर्माेकोलच्या पत्रावळ्या वापरल्या जातात. झाडाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या बऱ्याच वेळा फाटक्या असतात. सध्या जेवणात निरनिराळे अनेक पदार्थ करण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे पारंपरिक पत्रावळीत एवढे सगळे पदार्थ बसत नसल्याने प्लॅस्टिकच्या, थर्माेकोलच्या पत्रावळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.
या पत्रावळ्यांची झीज लवकर होत नाही, त्यामुळे पर्यावरणाची
हानी होत आहे. या पत्रावळ्यांतील राहिलेले अन्न भटकी कुत्री, इतर जनावरे खातात. हे अन्न
खाता खाता अन्नाबरोबरच पत्रावळीचा काही भाग त्यांच्या पोटात जाऊन त्यांनाही त्रास होण्याचा संभव लक्षात येत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून या पत्रावळ्या मातीत गाडून टाकणे, हा उपाय असून यापासून
कोणताही धोका नसल्याचे लक्षात येत आहे. (वार्ताहर)