पावसाने कडधान्य पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:26 AM2018-08-29T00:26:57+5:302018-08-29T00:27:19+5:30
भोर तालुक्याच्या दक्षिण भागातील स्थिती; नागरिकांच्या आरोग्याला धोका
नेर : भोर तालुक्याच्या दक्षिणेस गेल्या महिन्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. संततधार पावसाचा फटका खरिपातील कडधान्य पिकांना बसत आहे. खासरातील पिकांत पाणी साचून पिके सडून गेली आहेत. कडधान्य पिके खाचरात सडल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने भोरच्या दक्षिणेकडील विसगाव, चाळीसगाव खोऱ्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्याचा दक्षिण पट्ट्यातील विसगाव-चाळीसगाव खोरे डोंगररांगांमध्ये वसलेले आहे. याच भागात संततधार पावसाच्या लहरीपणामुळे खरिपातील कडधान्य घेवडा, चवळी, मूग, वाटाणा, उडीद, भुईमूग या पिकांमध्ये पंधरा ते वीस दिवसांपासून पाणी साचून राहिले आहे. परिणामी पिकांच्या मुळ्या सडून गेल्या आहेत. दोन ते तीन महिन्यांची हातातोंडाशी आलेली जोमदार पिके वाया जाणार असल्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे. संततधार पावसाने खरिपातील पिकांच्या नुकसानीबरोबरच नागरिकांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. भागातील नागरिक वारंवार आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सतत महिनाभर बरसणाºया पावसाला या भागातील नागरिक अक्षरश: कंटाळले आहेत.