वेळीच उपचार घेतल्याने १२ जणांचे कुटुंब कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:35+5:302021-04-29T04:07:35+5:30
धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीमध्ये राहणारे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते माऊली दारवटकर त्यांच्या बारा जणांच्या कुटुंबातील सदस्यांना ...
धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीमध्ये राहणारे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते माऊली दारवटकर त्यांच्या बारा जणांच्या कुटुंबातील सदस्यांना एकापाठोपाठ एक कोरोनाची लागण झाली होती.
डाॅ. संभाजी मांगडे हे दारवटकर कुटुंबासाठी देवदूत ठरले. डाॅ. मांगडे यांनी दारवटकर यांची आई लक्ष्मी दारवटकर यांना ॲडमिट करायला बेड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. तर घरातील ज्येष्ठ सदस्य या नात्याने ज्ञानेश्वर दारवटकर कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेत होते. दारवटकर यांचे मित्र शहाजी अडसूळ डाॅक्टरांपासून औषधोपचारापर्यंतचे सर्व सोपस्कार पार पाडत होते, तर त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी मयुरी अवचर व नात्यातील डिंबळे मावशी यांनी कुटुंबातील सदस्यांना जेवणाची व्यवस्था केली.
माऊली दारवटकर म्हणाले, आम्ही थोडाही आजार अंगावर काढला नाही. अत्यंत प्राथमिक अवस्थेत आम्ही आरटीपीसीआर टेस्ट केल्या व रिपोर्टची वाट न पाहता उपचार घेतले. कारण रिपोर्ट मिळायला ४ दिवस वाट पाहावी लागणार होती. परिणामी नेहमीच्या सर्दी-खोकल्यासारखा अत्यंत किरकोळ त्रास वगळता कुणालाच काही झाले नाही. केवळ घरातील २ ते ३ जणांचीच एचआरसीटी केली तेही शंका नको म्हणून! आई वगळता सर्वजण होम क्वारंटाईन राहूनच ठणठणीत बरे झाले.
आरती दारवटकर - स्वतःच्या कुटुंबातील इतक्या व्यक्ती जेव्हा एकापाठोपाठ एक कोरोनाबाधित होत होत्या, त्या वेळी एकत्र कुटुंबाची ही जबाबदारी अधिक खंबीर होऊन पार पाडण्याशिवाय माझ्यासमोर पर्यायच नव्हता. मला काही झाले नाही. ते केवळ इतरांच्या सेवेसाठीच असावे.