गोड बातमी; साखर होणार स्वस्त, कारखान्यांना बसणार फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:07 AM2022-05-26T10:07:48+5:302022-05-26T11:18:16+5:30
केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवर निर्बंध घातले...
पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने स्थानिक बाजारपेठेत साखर किमान दोन रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहक सुखावणार असला तरी साखर कारखान्यांना याचा काही प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. दुसरीकडे देशातून सुमारे ९५ लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य होते. ती आता जास्तीत जास्त १०० लाख टन होईल. त्यामुळे निर्यातबंदीचा फारसा परिणाम होणार नाही, असे साखर आयु्क्तालयाचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे १०० लाख टन साखर निर्यातीचा कोटा संपल्यानंतर पुढील निर्यातीस केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत देशातून ८५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. त्यापैकी ७५ लाख टन साखर यापू्र्वीच निर्यात झाली आहे. उर्वरित १० लाख टन साखरेचे करार पूर्ण होऊन ती जहाजांमध्ये पोहोचली आहे किंवा त्या स्थितीत आहे.
आतापर्यंत निर्यातीला फायदा
यंदा विक्रमी साखर निर्यात झाल्याने साखर कारखान्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला दर मिळत होता. त्यातच साखर निर्यातीत भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या ब्राझीलमध्येही साखर उत्पादन कमी झाल्याने भारताचा फायदा झाला. आता साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने साखर कारखान्यांना फटका बसणार आहे.
कारखान्यांना बसणार फटका
याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक महादेव पाटील म्हणाले, “आता कुठे साखरेला चांगला दर मिळत होता. साखर निर्यातीवर निर्बंध आल्याने कारखान्यांचे विक्रीचे गणित बिघडेल. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेत होईल. येत्या चार-पाच दिवसांत दर कमी होतील यात शंका नाही. सध्या कारखान्यांना ३५०० रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. तो किमान दोनशे रुपयांनी कमी होईल. त्यामुळे ग्राहकांना दोन रुपयांनी साखर स्वस्त मिळेल.
अशी आहे आकडेवारी
भारतातून निर्यात झालेली साखर : ८५ लाख टन
आणखी निर्यातीची शक्यता : १५ लाख टन
आतापर्यंतच्या निर्यातीतील महाराष्ट्राचा वाटा : ५६ लाख टन