Bull Cart Race: पुणे जिल्ह्यात जत्रा - यात्रांमुळे बैलगाडा शर्यतीची मागणी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:24 PM2022-02-09T19:24:33+5:302022-02-09T19:24:42+5:30
बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजक सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण
पुणे : बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजक सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात सध्या जिल्ह्यात जत्रा - यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाकडे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठीचे अर्जांची संख्या वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे परवानगीसाठी 16 अर्ज आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात पहिली बैलगाडा शर्यत भरविण्यासाठी स्पर्धा लागली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व मावळ तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी असे दोन अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केले होते. राज्य आणि जिल्ह्यातील पहिली बैलगाडा शर्यत म्हणून प्रचंड जय्यत तयारी देखील केली होती. परंतु दरम्यानच्या काळात पुणे जिल्हा आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढली आणि शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील 1 जानेवारी रोजी होणाऱ्या बैलगाडा शर्यतींना स्थगिती दिली. आता आढळराव पाटील आणि सुनिल शेळके यांच्या स्थगिती दिलेल्या बैलगाडा शर्यती 11 आणि 12 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर जिल्ह्यातील पहिली बारी होणार आहे.
दरम्यान जिल्ह्यात सध्या जत्रा- यत्रांचा हंगाम सुरू झाला असून, माघपौर्णिमेला 16 आणि 17 फेब्रुवारी दरम्यान सहा- सात गावांमध्ये खंडोबाची यात्रा भरवली जाते. या सर्व ठिकाणी पारंपारीक पध्दतीनुसार बैलगाड शर्यत आयोजित केली जाते. या सर्व गावांसह अन्य गावांमधून देखील बैलगाड शर्यतसाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज आले आहेत.
जाचक अटी कमी करा व स्थानिक स्तरावर परवानगी द्या
''सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता बैलगाड शर्यतीला परवानगी देण्यात येत असली तरी यासाठी अनेक जाचक अटी घातल्या आहेत. तसेच परवानगीसाठी तहसिलदार, पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी आठ-दहा दिवस जातात. याशिवाय परवानगीसाठी थेट पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे लहान-मोठ्या गावांना आवघड होऊन बसते. सध्या जिल्ह्यात जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू झाला असून, या निमित्त पारंपारीक, नवसाचे बैलगाड पळवले जातात. यासाठी शासनाने या जाचक अटी कमी करून स्थानिक स्तरावर परवानगी देण्याची सोय करावी असे राजेंद्र चव्हाण ( उपाध्यक्ष यात्रा समिती, वडज व गाडा मालक) यांनी सांगितले.''