Pune Breaking: अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना शनिवारपर्यंत सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 07:10 PM2022-07-13T19:10:17+5:302022-07-13T19:10:30+5:30
जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पुंरदर, दौंड व शिरूर हे पाच तालुके वगळून इतर तालुक्यांमध्ये १ ते १२ वीच्या सर्व शाळांना सुट्टी
पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात येत्या दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील चार तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये शनिवारपर्यंत जिल्हा परिषदेच्या तसेच इतर सर्व पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. घाट परिसरात अतिवृष्टी झाली असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुधवार व गुरुवार अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आपत्कालिन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातून विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पुंरदर, दौंड व शिरूर हे पाच तालुके वगळून इतर तालुक्यांमध्ये १ ते १२ वीच्या सर्व शाळांना शनिवारपर्यंत (ता. १६) सुटी देण्यात आली आहे. मात्र, या शाळांतील मुक्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत हजर राहून आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.