"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:17 IST2024-12-23T13:17:34+5:302024-12-23T13:17:56+5:30
अपघातात माझा पुतण्या आणि दोन लहान मुलांचा निष्पाप बळी गेलाय, आम्हाला घर देऊन राहण्याची व्यवस्था करावी, नातेवाईकांची मागणी

"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा
पुणे : आमच्या गावी कोणतीच सोय नसल्याने पुण्यात कामासाठी यावं लागतं. तसेच राहण्याची सोय नसल्यामुळे अशा पद्धतीने फुटपाथवर झोपावं लागतं. या अपघातात माझा पुतण्या आणि दोन लहान मुलांचा निष्पाप बळी गेला असल्याचे सांगत आम्हाला घर देऊन राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी माध्यमाशी बोलताना केली आहे.
वाघोली येथील केसनंद फाट्यावरती पुण्याकडून येणाऱ्या भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले. यावेळी मृतांच्या काकांनी माध्यमांशी संवाद साधत भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही सगळे अमरावतीचे आहोत. अमरावतीवरून या ठिकाणी विविध कामांसाठी आलो होतो. मात्र काल रात्री साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली, आणि आमच्या कुटुंबातले तीन जण यात गेले असल्याचे त्याची सांगितले आहे.
या गंभीर घटनेत जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री बार ते एक वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैभवी रितेश पवार ( वय १ वर्षे ), वैभव रितेश पवार (वय २ वर्षे),रीनेश नितेश पवार,(वय ३० वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रविवारी रात्रीच ते अमरावती येथून ते बिगारी व मजुरी कामासाठी आले होते.जवळपास एकाच कुटुंबातील बारा जण फूटपाथवर झोपले होते.तर शंभर ते दीडशे जण फूटपाथ च्या बाजूला झोपड्यात झोपले होते यामध्ये काही इतर राज्यातील आहेत तर काही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आलेले हाताला मिळेल ते काम करणारे सर्व मजुरी कामगार आहेत. वाहन चालक दारूच्या नशेत होता.