पार्सल न मिळाल्याने कस्टमर केअरला फोन करणे पडले महागात, पाच लाख गमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:18 AM2023-12-15T11:18:34+5:302023-12-15T11:20:01+5:30
हा प्रकार ११ डिसेंबर २०२३ रोजी घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली....
पुणे : कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी आंबेगाव बुद्रूक परिसरात राहणाऱ्या एका ४१ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केली. हा प्रकार ११ डिसेंबर २०२३ रोजी घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अधिक माहितीनुसार, तक्रारदार हे पार्सल मिळाले नाही म्हणून तक्रार निवारण करण्यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधत होते. एका वेबसाइटवर मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर फोन केला असता आम्ही कस्टमर केअरचे कर्मचारी आहोत. तुम्हाला काही मदत हवी आहे का? अशी विचारणा केली. तक्रारदार यांनी पार्सल मिळाले नसल्याचे सांगितल्यावर त्यांना रिमोट ॲक्सेस देणाऱ्या एका ॲप्लिकेशनची लिंक पाठवली. त्यावर क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करा, असे सांगण्यात आले.
तक्रारदार यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करताच त्यांच्या मोबाइलचा संपूर्ण ॲक्सेस सायबर चोरांना मिळाला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन रिमोट ॲक्सेसद्वारे बँक खात्यातून परस्पर ४ लाख ९० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड करत आहेत.