एकतर्फी प्रेमामुळे थेट आमदार, राजकीय पुढाऱ्यांनाच दिली धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 12:35 PM2023-04-08T12:35:22+5:302023-04-08T12:37:13+5:30
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले...
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी देऊन खंडणी मागण्याचा ट्रेंड सुरू होता. नगरसेवक, आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांना या धमक्या देण्यात आल्या आहेत. सतत होत असलेल्या अशा घटनांमुळे पुणेपोलिसांवरील ताण चांगलाच वाढला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले आहे.
शहानवाज खान (रा. कोंढवा), इम्रान शेख (रा. घोरपडी), खलील सय्यद (रा. भिवंडी) असे ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्यावर याआधी अशाप्रकारचे तीन ते चार गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांची एकमेकांशी गुंतागुंत आहे. एका कुटुंबाला नाहक त्रास देण्यासाठी हे कृत्य आरोपी करत असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले. तसेच एकतर्फी प्रेमातूनदेखील त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत व्हॉट्सअप मेसेजद्वारे ३० लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे देखील ३० लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. दोन्ही घटनेत पैसे ठेवण्यासाठी आरोपीने सांगितलेले ठिकाण आणि चारचाकी गाडी एकाच परिसरात असल्याचे समोर आले. तर यापूर्वी देखील असाच एक गुन्हा घडला होता. या गुन्ह्यात सांगितलेला गाडी नंबर व जागा एका कुटुंबाची आहे. वारंवार त्यांच्याच ठिकाणाचा उल्लेख आरोपींकडून खंडणी स्वीकारण्यासाठी करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची विविध बाजूने चौकशी करण्यात येत आहे. कुटुंबीयांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. तर एकतर्फी प्रेमातूनसुद्धा आरोपीने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.