पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुरडी परतली आईच्या कुशीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 03:10 PM2022-09-12T15:10:58+5:302022-09-12T15:19:29+5:30
पोलिसांसह समाज कार्यकर्ते रोहिदास जोरी यांनी मुलीचा फोटो सामाजिक माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचवला
कोथरुड : यंदाचा गणपती उत्सव मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला. गणेश उत्सवात बड्या संख्येने नागरिकांची गर्दी असल्याने त्यामुळे असा गर्दीत प्रौढ माणसांचीही हुकाचुक होते, अशीच एक घटना कोथरुड येथील पौड रोड जयदीप मंडळाजवळ घडली आहे. एक हरवलेली ८ वर्षाची चिमुकली आढळून आली. गणपती विसर्जन मिरवणुकीत ही चिमुकली रडताना महिला पोलीस नाईक अनुराधा ठोंबरे, विशाल शिंदे त्यांनी चिमुकलीला चौकीत आणले. तिच्याकडे विचारपूस केली असता क्रांती असे नाव तिने सांगितले. परंतु तिचा पत्ता शोधणे पोलिसांचा आवाहन होते. सदर चिमुकलीचा फोटो पोलिसांसह समाज कार्यकर्ते रोहिदास जोरी यांनी सामाजिक माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचवला.
तसेच पोलिसांनी फेसबुक च्या माध्यमातून तिच्या आईचे - वडिलांचे नाव शोधून चिमुकलीला ओळखण्यास सांगितले. तिने आईचा फोटो पाहताच ओळख पटली. परंतु संबंधित संपर्क क्रमांकावर संपर्क केला असता तो होणे शक्य होत नव्हते. तोपर्यंत रोहिदास जोरी यांनी त्यांच्या संपर्कातील सर्व व्हाट्स अँप ग्रुपवर चिमुकली सापडली आहे अशी पोस्ट टाकली. या पोस्ट, व पोलीस यांच्या दक्षतेमुळे समाज माध्यमातून ही पोस्ट तिच्या आईपर्यंत पोहोचली. आपली मुलगी एरंडवणा पोलीस चौकीत असल्याचे समजताच आई प्रियांका यांनी रात्री उशीरा पर्यंत चौकीत धाव घेतली. आपली मुलगी पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू वाहिले.
सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलंडे, कोथरुड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप, पोलिस निरिक्षक बाळासाहेब बढे, पोलिस उपनिरिक्षक तानाजी पांढरे, विक्रम पवार, चैतन्य काटकर, यांनी मुलीचे पालक शोधण्यासाठी सहकार्य केले.