राज ठाकरेंच्या सभेमुळे सारसबाग परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, पुणेकरांना नाहक त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:30 AM2024-05-11T11:30:17+5:302024-05-11T11:31:29+5:30
सभेच्या आधी सकाळी एकदा ट्रायल रन, दुपारी पुन्हा एकदा तोच सीन, सायंकाळी ७ नंतर तर रस्तेच बंद...
पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेने पुणेकरांना वाहतुकीचा असा त्रास सहन करावा लागला. सभा संपल्यावर रात्री साडेनऊ वाजता वाहतूक सुरळीत झाली व सारसबाग परिसरातील रस्ते मोकळे झाले.
सारबागेजवळच्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यावर सभेचे व्यासपीठ उभे करण्यात आले होते. त्या रस्त्याची एक बाजू पूर्ण बंद करण्यात आली. ती सर्व वाहतूक सारसबाग चौपाटीकडून वळविण्यात आली. सकाळी वाहतूक शाखेने एकदा ट्रायल रन म्हणून चाचणी घेतली. त्यावेळी कार्यालयाकडे निघालेल्या पुणेकरांना वाहन वळवून पर्यायी रस्त्याने जावे लागले.
दुपारी व्यासपीठ टाकण्यास सुरुवात झाल्यानंतर तर तो रस्ता बंदच करण्यात आला. सायंकाळी सभा सुरू झाल्यानंतर पूर्णच रस्ता बंद झाला. त्यामुळे स्वारगेटकडून येणाऱ्या, नेहरू स्टेडियमपासून येणाऱ्या सर्वच वाहनधारकांना पर्यायी रस्ता शोधून आपला मार्ग काढावा लागला.
रस्त्यावर सभा नको, म्हणून पुणेकरांकडून सभेला समाजमाध्यमांवरून बराच विरोध झाला. काही वर्षांपूर्वी केळकर चौकात राज यांची सभा झाली होती. त्यावेळी संतापलेल्या पुणेकरांनी रस्त्यावर सभा घेऊच नयेत, म्हणून तीव्र विरोध केला होता. आताही विरोध होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून वाहतूक शाखा, पोलिस यांनी सभा रस्त्यावर घेण्यास परवानगी दिली. वाहतूककोंडी होणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासन भाजपचे पुणे लोकसभा संयोजक राजेश पांडे यांनी दिले होते. मात्र, व्हायचे तेच झाले. दिवसभरात पुणेकरांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागलाच.
महेश पाटील, नागरिक