Mahavitaran Strike: महावितरच्या संपामुळे बत्तीगुल; पिंपरीत नागरिकांचे हाल, एक हजारहून अधिक लघुउद्योग ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 08:47 PM2023-01-04T20:47:08+5:302023-01-04T20:56:46+5:30

शहरातील अनेक भागांत सकाळी ६ वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित

due to strike of Mahavitaran People plight more than a thousand small industries stopped | Mahavitaran Strike: महावितरच्या संपामुळे बत्तीगुल; पिंपरीत नागरिकांचे हाल, एक हजारहून अधिक लघुउद्योग ठप्प

Mahavitaran Strike: महावितरच्या संपामुळे बत्तीगुल; पिंपरीत नागरिकांचे हाल, एक हजारहून अधिक लघुउद्योग ठप्प

Next

पिंपरी : महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भागांत सकाळी ६ वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले. तर खंडीत विजपुरवठ्यामुळे एक हजारहून अधिक लघुउद्योग ठप्प झाले होते.

भोसरी, निगडीतील काही भागांत सकाळी ४ वाजल्यापासूनच बत्तीगुल झाली होती. भोसरी एमआयडीसीतील सेक्टर ७ तसेच निगडीतील यमुनानगर व इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. दुपारी १२ च्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे नागरिक तसेच उद्योजकही चांगलेच त्रस्त झाले होते. इन्व्हरटरही बंद झाल्याने, अनेकांची गैरसोय झाली होती.

या भागांतील झाला होता वीजपुरवठा खंडीत...

भोसरी एमआयडीसी सेक्टर ७, वाकड व सांगवीमधील काही परिसर, कुदळवाडी, देहू गाव, बोऱ्हाडेवाडी, चिखली तसेच निगडीमधील ओटा स्कीम परिसरातील वीजपुरवठा विविध बिघाडांमुळे खंडित झाला होता. यासोबतच चाकण एमआयडीसीमधील पाच वीजवाहिन्या तसेच तळेगाव शहर, इंदोरी, वडगाव, सोमाटणे, नाणेकरवाडी, कुरळी, कडूस गावांना वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता.सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू होते.

एमआयडीसीला फटका..

पिंपरी- चिंचवडच्या एमआयडीसीला याचा थेट फटका सकाळी बसला. पिंपरी- चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीत तीन ते चार तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. याचा थेट फटका लघु उद्योजकांना बसला. एक हजारहून अधिक लघुउद्योग ठप्प होते. शेकडो कामगार बसून होते. मात्र, पुन्हा वीजपुरवठा सुरळीत झाल्याने लघुउद्योग सुरू झाले.

वर्क फ्राॅम होम ची गैरसोय...

वर्क फ्राॅम करणा-या आयटी कर्मचा-यांनाही या संपाचा फटका बसला. सकाळी काही तास वीज नसल्याने काम बंद ठेवावे लागल्याचे आयटीयन्सनी सांगितले.

अधिकारी ऑन फिल्ड..

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने मंगळवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर ७२ तासांचा संप पुकारला होता. हा संप बुधवारी (दि. ४) सायंकाळी मागे घेण्यात आला आहे. या संपात दिवसभराच्या पाळीमध्ये पुणे परिमंडलातील ९२ टक्के कर्मचारी, अभियंता व अधिकारी सहभागी झाले होते. तर दुसरीकडे मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे विविध कारणांनी खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी रात्रभरापासून ‘ऑन फिल्ड’ होते.

इले्क्ट्रीक एमपीएमएल सुरळीत...

निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ पीएमपीचा डेपो आहे. त्या डेपोत इलेक्ट्रीक बसलाही चार्जिंगची सुविधा आहे. सकाळी ६ वाजल्यापासून निगडी परिसरातील वीज गायब होती. मात्र, निगडीतील पीएमपी डेपो मध्ये पॉवर बॅकअप असल्याने इलेक्ट्रीक गाड्या सुरळीत सुरू होत्या.

कर्मचारी बसून लघुउदयोजकांचे नुकसान...

पिंपरी- चिंचवडच्या भोसरी एमआयडीसीतील एक हजारहुन अधिक लघु उद्योजकांना महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला. सकाळी साडेसात ते साडेअकरा असा तीन ते चार तास वीज पुरवठा खंडित होता. यामुळं लघु उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. महावितरणचे अधिकारी देखील या संपात सहभागी होते.- संदीप बेलसरे, अध्यक्ष, लघुउद्योजक संघटना 

Web Title: due to strike of Mahavitaran People plight more than a thousand small industries stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.