अकार्यक्षम प्रशासनामुळे पुणे शहर गेलं खड्ड्यात! खराब रस्त्यांमुळे सामान्यांची हाडे खिळखिळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 10:17 AM2023-07-31T10:17:35+5:302023-07-31T10:18:09+5:30
पुणेकरांची हाडे खिळखिळी!
पुणे : शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस पडत आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडले आहेत. यात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यारस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुणेकरांची हाडे खिळखिळी झाली आहेत. प्रवास करताना खड्ड्यात आदळून हादरे बसल्याने मानदुखी, स्लिप डिस्क, कंबर लचकणे, मणक्यांचे फ्रॅक्चर अशा विकारांचा सामना करावा लागत आहे. तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात गाडी घसरल्याने अनेकांवर हातपाय गळ्यात बांधून घेण्याची वेळ आली आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी दुचाकी बंद पडत आहे. शहरातील रस्त्यांत पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. काही जखमींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. काही कायमचे जायबंदी झाले आहेत. पावसाळ्यात अपघात आणि मणक्यांच्या विकारांवर उपचारासाठी रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सत्तरीच्या पुढील वयोवृद्ध महिला आणि तरुण दुचाकीस्वारांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. परिणामी पावसाळ्यातील अपघात आणि खड्ड्यांमुळे मणक्यांच्या विकारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे ३० टक्क्यांनी वाढली आहे.
खिशालाही हादरा :
दुचाकीवरून पडणे, गाडी घसरल्याने दुखापत होणे, खड्ड्यातून गाडी गेल्याने मणका दुखणे, फ्रॅक्चर अशा रुग्णांची संख्या दोन महिन्यांपूर्वी अत्यल्प होती. आता या तक्रारी घेऊन बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने होणारे फ्रॅक्चर, स्लिप डिस्क, मणक्याचे हाड तुटणे, कंबरदुखी, मानदुखीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी नागरिकांना तब्बल ५० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे खड्ड्यांमुळे नागरिकांच्या खिशालाही हादरा बसत आहे.
प्रवास करताना घ्या काळजी
- गाड्यांचे शॉक ॲब्सॉर्बर्स दुरुस्त करून घ्या.
- पाण्यातून गाडी चालविताना सावकाश चालवा.
- कमरपट्टे बांधल्यास मणक्यांना बसणारे हादरे कमी होतात.
पुण्यातील नेते कोठे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली. खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश दिले; पण पुणे शहरातील रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते अशी स्थिती असताना पुण्यातील नेते कोठे आहेत असा सवाल केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या नेत्यांनीही अद्याप खड्ड्यांची पाहणी करून पुणे पालिकेला काेणतेही निर्देश दिलेले नाही. त्यामुळे पुण्यातील नेते कोठे आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. दुचाकीचे शहर असलेल्या पुण्यात, खड्ड्यांमुळे दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. चारचाकी वाहनांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. पादचाऱ्यांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येत्या १५ दिवसांत पुणे शहर खड्डेमुक्त करावे; अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी महापालिकेला दिला आहे.
पावसाळा आणि खड्डे यांमुळे कंबर आणि मणक्यांच्या विकारांवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. वयोवृद्धांमध्ये स्लिप डिस्कचे प्रमाण वाढत आहे. प्रवासाची कामे करणाऱ्या मध्यमवयीन व्यक्तींना वारंवार खड्ड्यात आदळल्याने कायमस्वरूपी पाठदुखी होऊ शकते. पावसाचे पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होऊन हातपाय फ्रॅक्चर होण्याचे प्रमाणही वाढते.
- डॉ. श्रीनिवास शिंत्रे, ट्रामा सेंटर, ससून रुग्णालय
तरुण दुचाकीस्वारांमध्येही कंबरदुखी व कंबर लचकण्याचे प्रमाण वाढते आहे. वाहन चालविताना खड्ड्यांमुळे मानदुखी, कंबरदुखीचे आजार वाढले आहेत.
- डॉ. स्नेहल दंतकाळे, ऑर्थोज, बाणेर
खड्ड्यांमुळे मानदुखी, कंबर, मणक्यांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात गाडी घसरून अपघात होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
- डॉ. मिलिंद मोडक, ऑर्थोपेडिक सर्जन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय