राज्य सरकारच्या स्थगिती आदेशामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या २६ कामांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 03:10 PM2022-07-21T15:10:57+5:302022-07-21T15:12:27+5:30
जिल्हा नियोजन आराखड्यातील कामांना स्थगिती...
पुणे : शिंदे-फडणवीस सरकारने पदभार सांभाळताच राज्यातील जिल्हा नियोजन आराखड्यातील सुमारे साडेतेरा हजार कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. त्यातील पुणे जिल्ह्यातील सव्वाचारशे कोटींच्या कामांचा समावेश होता. मात्र, मंजूर कामांचे कार्यारंभ आदेश, तसेच कामांची कार्यवाही अगोदरच पूर्ण झाल्याने १०३१ कामांपैकी अवघ्या २६ कामांना स्थगिती मिळाली आहे. जिल्हा परिषदेने गतवर्षी राबविलेल्या शंभर दिवस या कार्यक्रमामुळे ही कामे वेळेत पूर्ण झाली.
स्थगिती आदेश देण्यापूर्वी जिल्हा परिषदेची अशी एकूण १०३१ कामे होती. त्यातील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. १०२६ कामांना तांत्रिक मान्यता देऊन १००५ कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. केवळ २६ कामांचे कार्यारंभ आदेश प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेने वेळेत कामांची कार्यवाही केल्यामुळे या निर्णयाचा फटका जिल्हा परिषदेला बसला नाही.
जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी राबविलेल्या शंभर दिवस या कार्यक्रमामुळे ही कामे वेळेत पूर्ण झाली. एकूण १ हजार ३१ कामे होती. त्यातील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर, १ हजार २६ कामांना तांत्रिक मान्यता देऊन १ हजार ५ कामांचे कार्यारंभ आदेश देखील देण्यात आले होते. या कामांमध्ये पंचायत समित्यांकडे प्रशासकीय इमारत बांधण्याची १९ कामे, ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत निवासी ११ इमारती, रस्ते-पूल गट क ५ कामे, रस्ते-पूल गट ड ६ कामे, गट ब १४९ कामे, गट अ ४० कामे, ग्रामीण रस्त्यांची ७६३ कामे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारतींची १२ कामे यांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही स्थगिती आदेश येण्यापूर्वीच पूर्ण झालेली आहे.