अपूर्ण कामांमुळे यंदाही पालखी सोहळ्याची वाट बिकट; वैष्णवांना करावा लागणार अडचणींचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 01:12 PM2024-05-26T13:12:05+5:302024-05-26T13:12:19+5:30
विशेषत: बारामती-सणसर मार्गावर लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काही ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण
बारामती/काटेवाडी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपले आहे. मात्र, पालखी सोहळा तोंडावर आलेला असताना संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे अपूर्ण काम वारकरी भाविकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. विशेषत: बारामती-सणसर मार्गावर लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काही ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पालखी सोहळ्याची वाट बिकट ठरणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गापैकी पाटस ते बारामती मार्गाचे काम वेळेत पूर्ण झाले आहे. मात्र, लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काम संथ गतीने सुरु आहे. मासाळवाडी येथील पुलाच्या अंडरपासचे काम अद्याप सुरूच आहे. या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी एकेरी वाहतूक देखील सुरु आहे. मात्र, अंडरपासचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. येथील अंडरपासच्या भोवती राडारोडा जैसे थे आहे. येथील कामाच्या सळया उघड्यावर आहेत. पालखी प्रस्थान काळात या कामाच्या भोवती संरक्षक कठडा उभारण्याची गरज आहे. याच्या भोवती असणारे खड्डे अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यालगत असणाऱ्या गटारी भोवती काही ठिकाणी खड्डे आहेत. हे खड्डे बुजविण्याची गरज आहे. नव्याने खोदाई केलेला रस्ता पालखी सोहळा आगमनापूर्वी पूर्णतत्वास जाणे महत्त्वाचे आहे. रस्त्यासाठी नव्याने जुळवणी करताना लगतचा रस्ता पूर्ण खड्ड्यात आहे. त्यामुळे लिमटेक येथून मार्गस्थ होताना पालखी सोहळ्यातील शेकडाेंच्या संख्येने वाहने आणि लाखो वारकरी भाविकांसाठी हा मार्ग अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालखी आगमनाच्या काळात कर्मचारी नियुक्त करुन संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.
काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील पालखी रथाच्या भोवती मेंढ्याचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण एसटी स्टॅन्ड परिसरात पार पडते. मात्र, या परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरु आहे. या कामामुळे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. गटार योजनेच्या विलंबाने हे काम थांबले होते. ते काम सध्या सुरु आहे. मात्र, ते युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. उड्डाण पुलावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पुलावरील दुसऱ्या मार्गाचे काम सुरु आहे. मात्र, ते देखील वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.
काम पूर्ण होण्यासाठी कधीचा मुहूर्त उजाडणार ?
संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग एकूण १३७ किमीचा आहे. त्याचे काम तीन टप्प्यात करण्यात येत आहे. पालखी मार्गात ग्रामीण भागात पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर, इंदापूर ते तोंडले बोडसे या तीन टप्प्यांचा समावेश आहे. त्यापैकी पाटस ते बारामती काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरु आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी कधीचा मुहूर्त उजाडणार, याबाबत संबंधित गावांमध्ये चर्चा रंगली आहे.
उन्हाच्या तडाख्यात चालावे लागणार
बारामती इंदापूर मार्गावर यापूर्वी महाकाय वडाची झाडे असल्याने हा मार्ग हिरवागार होता. पालखी सोहळ्यातील भाविकांना या मार्गावर विसावा घेण्यासाठी झाडांची हिरवाई होती. वारकरी भाविक वडाच्या झाडाच्या पारंब्यांना झोका घेण्याचे खेळ खेळण्यात रंगून जात. मात्र, पालखी महामार्गाच्या कामासाठी सर्व झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पालखीतील भाविकांना झाडांशिवाय उन्हाच्या तडाख्यात चालावे लागणार आहे.