वाहतुकीमुळे रस्त्याची लागली वाट
By admin | Published: October 12, 2016 02:37 AM2016-10-12T02:37:08+5:302016-10-12T02:37:08+5:30
तालुक्यातील उजनी जलाशय क्षेत्रातील गेले सहा महिने अवैध वाळू वाहतुकीमुळे प्रमुख जिल्हा मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली
लोणी देवकर : तालुक्यातील उजनी जलाशय क्षेत्रातील गेले सहा महिने अवैध वाळू वाहतुकीमुळे प्रमुख जिल्हा मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नादुरुस्त रस्त्यामुळे येथील आगारांनी या मार्गावरील बससेवा बंद केली आहे. ‘आधी रस्तेदुरुस्ती, मगच बस सोडणार,’ असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यामुळे मात्र नागरिकांची गैरसोय होत आहे.
लोणी देवकर, वरकुटे (बु) गंगावळण, कळाशी, अगोती १, २ हा प्रजिमा १५९ या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली. या रस्त्यावरून १० ते १५ टन भाराने वाहतूक होणे गरजेचे आहे. परंतु सध्या ४० ते ४५ टन भाराने अवैध वाळू वाहतूक होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्ता पूर्णपणे खचला असून, त्यावरती डांबरही राहिले नाही. परिसरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर विद्यार्थी, शेतमालाची वाहतूक करणारी वाहने, ऊस वाहतूक करणारे ट्रक-ट्रक्टर यांची खूप मोठी वर्दळ असते. वाहनचालकाला वाहन चालविताना कसरत करावी लागते. रस्त्याची अवस्था पाहून इंदापूर आगाराने संभाव्य धोका टाळण्यासाठी या रस्त्यावरील एसटीबस बंद केल्या आहेत. रस्तादुरुस्ती केल्याशिवाय एसटी बस सोडणार नाही, अशी ठाम भूमिका आगाराने घेतल्याने विद्यार्थी, नागरिक यांची गैरसोय झाली आहे. तरी तहसीलदारांनी वाळू चोरांवर कारवाई करावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्त्याची दुरूस्ती करून खडीकरण, मजबूतीकरण व डांबरीकरण करावे, अशी विद्यार्थी, वाहन चालक व ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)