ओखी चक्रीवादळ दक्षिण गुजरातच्या दिशेने, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 09:28 PM2017-12-04T21:28:35+5:302017-12-04T21:28:52+5:30
पुणे : पूर्वमध्ये आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर असलेले अतितीव्र चक्रीवादळ ओखी आता पूर्वमध्य अरबी समुद्रावर असून ते वायव्य दिशेकडे सरकत आहे. सध्या त्याचे मुंबईपासूनचे अंतर अंदाजे 670 किमी आहे. त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर अति कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे.
पुणे : पूर्वमध्ये आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर असलेले अतितीव्र चक्रीवादळ ओखी आता पूर्वमध्य अरबी समुद्रावर असून ते वायव्य दिशेकडे सरकत आहे. सध्या त्याचे मुंबईपासूनचे अंतर अंदाजे 670 किमी आहे. त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर अति कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे. ते दक्षिण गुजरात आणि लगतच्या उत्तर महाराष्ट्राच्या किना-यावर 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कोकण, मुंबईसह गुजरातमध्ये समुद्र खवळलेला राहील. येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हे चक्रीवादळ सोमवारी दुपारी चार वाजता हे चक्रीवादळ सुरतपासून अंदाजे 770 किमी अंतरावर होते. या चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात सोमवारी सकाळी वारे ताशी 110 ते 120 किमी वेगाने वाहत होते. रात्री त्यांचा वेग कमी होण्याची शक्यता असून 5 डिसेंबरला त्यांचा वेग आणखी कमी होऊन ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे उत्तर व दक्षिण कोकणात काही ठिकाणी सोमवारी हलका पाऊस झाला असून पुढील 24 तासांत उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी, दक्षिण कोकण व गोव्यात ब-याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरात किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 डिसेंबरला कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5 डिसेंबरला दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर व किनारपट्टीलगत ताशी 50 ते 60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून असून उत्तर महाराष्ट्राच्या लगतचा समुद्र खवळलेला राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या चक्रीवादळामुळे विदर्भ वगळता संपूर्ण राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे 94 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. राज्यात सोमवारी सायंकाळी सातारा, नवी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 24 तासांत पुणे शहरात काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून मुंबई शहर व उपनगरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगत ताशी 50 ते 60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईचा धोका टळला
ओखी हे चक्रीवादळ आता दक्षिण गुजरातच्या दिशेने सरकत असून त्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. मुंबईपासून अंदाजे 670 किमी अंतरावरुन ते जात असल्याने मुंबईत पाऊस झाला तरी त्याचा धोका आता टळला आहे. हे चक्रीवादळ साधारणपणे ताशी 13 किमी वेगाने पुढे सरकत आहे. त्याची तीव्रता आता हळूहळू कमी होऊ लागली असून 6 डिसेंबर रोजी ते गुजरात व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात प्रवेश करेल, त्यावेळी त्याची तीव्रता खूपच कमी झालेली असेल.
डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ