बेशिस्तीमुळे वाघोलीत वाहतूककोंडी, राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:09 AM2018-08-26T02:09:36+5:302018-08-26T02:10:11+5:30
पुणे-नगर महामार्ग हा कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षांपर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे
वाघोली : पुणे-नगर महामार्ग हा कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षांपर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे. मात्र, याच मार्गावर आता नवीन समस्या उभी राहिलेली आहे, ती म्हणजे वाहतूककोंडीची. त्यामुळे वाहतूककोंडीचा महामार्ग असे नवीन नाव त्याला देण्यात आले आहे.
अरुंद चौक आणि रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहनांनी केलेले अतिक्रमण, व्यापाऱ्याची रस्त्यावर दुकानदारी व अपुरे पोलीस प्रशासन, राजकीय उदासीनता अशा परिस्थितीत वाघोलीमधील मुख्य रस्त्यावर बेशिस्त वाहतुकीमुळे मोठी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिलांसह वाहनचालकांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच, रस्त्यावर चालताना पादचाºयांना तारेवरची कसरत करावी लागते. या दैनंदिन बेशिस्त वाहतूककोंडीमुळे नागरिक वाहनचालक हैराण झाले आहेत. पुणे-नगर महामार्ग मराठवाडा, विदर्भाला जोडणारा असल्याने सतत वर्दळीचा आहे. वाहनांची संख्यादेखील मोठी असते. वाघोलीत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी ये-जा करीत असतात. या विद्यार्थ्यांनाही या बेशिस्त वाहतूककोंडीचा त्रास सोसावा
लागतो.
साईडपट्ट्या खराब
पुणे-नगर रोडवरील खांदवेनगर ते आळंदी फाटा पर्यंतच्या रोडवरील दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या खराब होऊन मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत, तेही तत्काळ भरून घेणे गरजेचे आहे. तसेच पोलिसांनी विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांवर रोज सकाळी व सायंकाळी कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
पोलीस बळ हे अपुरे नसून पुरेसे आहे. नुसत्या पोलिसांकडून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी बांधकाम विभागाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोडच्या साईडपट्ट्यांची कामे झाली पाहिजेत. बाजूची अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे. तत्काळ सिग्नल चालू करण्यात येतील. रस्तावर पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल .
- सुहास गरुड (उपविभागीय पोलीस अधीकारी हवेली )
पोलिसांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बाजाराच्या दिवशी व्यापाºयाने रोडवर बसू नये; अन्यथा ग्रामपंचायीकडून त्याच्यावर आणि टेडंर घेणाºयावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अवैधरीत्या रोडवर, रोडच्या कडेला वाहन पार्किंग केल्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.
- वसुंधराताई उबाळे
(सरपंच वाघोली)