नियोजनशून्य कारभारामुळे खोरची पेयजल योजना पडली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:39+5:302021-07-12T04:07:39+5:30
रामदास डोंबे खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून ...
रामदास डोंबे
खोर : खोर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेली १५ दिवसांपासून बंद पडली गेली आहे. दुष्काळी भागाला उन्हाळ्याच्या कालावधीत देखील वरदान ठरेल या हेतूने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ही २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपये खर्चून ही पेयजल योजना राबविण्यात आली आहे. मात्र आज गेली १५ दिवसांपासून ही योजना केवळ खोर ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे बंद पडली.
याबाबत माहिती देताना खोर ग्रामपंचायतचे उपसरपंच पोपट चौधरी म्हणाले की, ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे २ कोटी ४७ लाख ८० हजार रुपयांची पाणी योजना बंद झाली आहे. ग्रामपंचायतवर कर्मचारी कमी करण्याची वेळ आज आली आहे.
लोकांचे पाण्यासाठी हाल सध्या हाल होत आहेत. कार्यालयाच्या दारात रोज येऊन बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्रामपंचायतकडून अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च होत असून खोर ग्रामपंचायत आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करीत असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. लोकांचे पाण्याचे हाल होत असल्याने शशांक फाउंडेशनच्या माध्यमातून खोर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. खोर ग्रामपंचायतचे वीजबिल हे गेले अनेक वर्षांपासून थकीत असून, आज विद्युतीकरण तोडण्यास सुरुवात झाली आहे. एवढे मोठे दुहेरी अडचण आज ग्रामपंचायतने करून ठेवली असल्याचे उपसरपंच चौधरी यांंनी सांगितले आहे.
माजी सरपंच ज्ञानेश्वर चौधरी म्हणाले की, एका मोठ्या संघर्षातून खोरसारख्या दुष्काळी गावाला ही पाणी योजना मिळाली. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. दुष्काळी गावाला वरदान असलेली ही जलसंजीवनी योजना बंद पडणे म्हणजे दुर्दैवी बाब आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करून योजना पूर्ववत चालू ठेवावी.
ग्रामविकास अधिकारी एम. जी. पाडुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखाचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे.
याबाबतीत खोर ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली अडसूळ व त्यांचे पती संदीप अडसूळ या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी फोन न उचलता या पाण्याच्याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.
वरवंड तलाव ते पिंपळाचीवाडीपर्यंत करण्यात आलेली पेयजल योजना ही लिकेज असल्याने पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असून खोर ग्रामपंचायतवर ३ लाखांचे वीजबिल थकीत असून, दि. १२ रोजी आम्ही महावितरण विभाग यांच्याशी बोलणे करून तडजोड करण्याची भूमिका घेऊन बिल भरणा करणार आहे
खोर (ता. दौंड) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गेली १५ दिवसांपासून बंद असून दुसऱ्या छायाचित्रात खोरच्या परिसरात पाण्याच्या कमतरतेमुळे शशांक फाउंडेशनने मोफत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.