अवकाळी पावसामुळे हिरड्याचा बहर गेला झडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:09 AM2021-04-16T04:09:44+5:302021-04-16T04:09:44+5:30
तळेघर: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खो-यामध्ये पडलेल्या मुसळधार गारांच्या अवकाळी पावसामुळे ...
तळेघर: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खो-यामध्ये पडलेल्या मुसळधार गारांच्या अवकाळी पावसामुळे हिरडा व जनावरांसाठी लागणा-या चा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे हिरड्याचा बहर पूर्णपणे झडून गेला आहे.
पश्चिम आदिवासी भागामध्ये सलग दोन दिवस मुसळधार पडलेल्या अवकाळी पावसामुळे रचून ठेवलेले गवत भाताचा पेंढा भिजून गेला आहे. हा चारा भिजून गेल्यानंतर काळा पडतो व जनावरांच्या खाण्यालायक राहत नाही. यामुळे चा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर भात शेतीसाठी करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे. नुकतीच भात शेतीच्या कामांसाठी सुरुवात झाली आहे. पावसामुळे पाडलेल्या रोमठे (जमिनीचे सपाटीकरण) उखडले असल्यामुळे आदिवासी बांधवांचे पुन्हा शेतीचे काम वाढले आहे. तर रोपे भाजणीसाठी जमा करण्यात आलेला शेणाचा गोवर, पालापाचोळा, भिजल्यामुळे भात रोपाच्या भाजणीचे काम पुढे ढकलावे लागणार आहे.
आदिवासी बांधवांच्या एकमेव उदरनिर्वाहाचे साधन समजल्या जाणा-या हिरड्यांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे. सध्या हिरड्यांना नवी पालवी फुटून हिरड्या बहरत आहेत. पाऊसाचा व गारांचा मारा या बहरावरती झाल्याने हा बहर झडला आहे. त्यामुळे उत्पादन घट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकसान झालेल्या हिरड्यांच्या झाडांचे प्रशासनाने पंचनामे करावेत, अशी मागणी माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे कोंढवळचे सरपंच दीपक चिमटे, रामदास लोहकरे भीमाशंकर देवस्थान विश्वस्त दत्तात्रय लोहकरे, बबन लोहकरे, दुंदा जढर व परिसरातील आदिवासी शेतक-यांनी केली आहे.
सध्या आमच्या भागामध्ये शेतीच्या मशागतीची काम सुरू आहेत. भात रोपे तयार करण्यासाठी अगोदर भात खाचरे भाजावी लागतात यासाठी भात खाचरे सपाट करावी लागतात याला आदिवासी रोमठा म्हणतात. आम्ही रोमठा पाडला असुन पडलेल्या पावसामुळे हा रोमठा उस्तरला असुन आमच्या आदिवासी बांधवांचे पुन्हा काम वाढले आहे. आता दहा-बारा दिवसानंतर जमीन तापल्यावर पुन्हा रोमठा पाडावा लागेल. त्याचप्रमाणे शेणाचा गोवर पालापाचोळा भिजल्यामुळे आता भात खाचरांची भाजणी पुढे ढकलावी लागणार आहे.
बबन लोहकरे
आदिवासी शेतकरी
१५ तळेघर
भीमाशंकर, पाटण व आहुपे खो-यामध्ये अवकाळी गारांच्या मुसळधार पावसाने हिरड्याचा बहर झडून गेला.