प्लॅस्टिक, फायबरच्या वापरामुळे बांबू उत्पादने आली संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 01:29 PM2019-11-07T13:29:05+5:302019-11-07T13:29:19+5:30
आधुनिक काळात प्लॅस्टिक, फायबरच्या वापरामुळे बांबूपासून तयार होणारी उत्पादने संकटात आली आहेत.
पुणे : बांबू हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते़ त्याचबरोबर बांबूपासून अनेक वस्तू तयार करून त्यातून उत्पन्न मिळवता येते. परंतु, आधुनिक काळात प्लॅस्टिक, फायबरच्या वापरामुळे बांबूपासून तयार होणारी उत्पादने संकटात आली आहेत. बांबूपासून तयार झालेल्या वस्तूंची मागणी निम्म्यावर आली असल्याचे विक्रेत्यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगीतले.
पूर्वी बांबूपासून तयार झालेल्या चटई, सूप, टोपली, दुरडी, हातपंखा, झाकण, करंडी आदी वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी असायची. काळानुसार यांची जागा ही आता प्लॅस्टिकपासून बनविलेल्या वस्तंूनी घेतली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी बदलत्या काळानुसार बांबूच्या वस्तू तयार करणाºयांनीही आपल्यामध्ये बदल करून घेतला आहे़
तेही आता पारंपरिक वस्तूंसोबत फ्लॉवरपॉट, लॅम्प, टोपी, बादली, शोभेच्या व गृहसजावटीच्या वस्तू, बांबू हाऊस, चटई पार्टिशन या वस्तू बनवत आहेत़
धार्मिक शास्त्रानुसार बांबू हा माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत लागणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आज बदललेल्या परिस्थितीत व प्रदूषणयुक्त वातावरणात बांबू, बांबूशेती, बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तू समाजातील सर्व घटकांसाठी फायदेशीर असून, हे सर्व पर्यावरणपूरक आहेत़. प्रदूषणात दिवसेंदिवस अमाप भर घालणाºया प्लॅस्टिकचे वाढते आक्रमण थोपवण्यासाठी एक चांगली मदत या माध्यमातून होईल़ याचबरोबर बांबू उत्पादकांनाही चालना मिळेल़ यासाठी बांबू उत्पादन वाढवण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना होत आहेत. त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे उत्पादकांचे आणि विक्रेत्यांचे म्हणणे आहे. बुरुड समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. शासकीय योजनांची माहिती नसल्यामुळे शासकीय योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. बुरूड समाजबांधवांनी पारंपरिक व्यवसायाची मानसिकता बदलून आर्थिक प्रगतीसाठी व स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन योजनांचा व आधुनिकतेचा विचार करणे ही काळाची गरज आहे.
.........
जगात बांबूच्या पंधराशे जाती आहेत. यातील शंभर ते दीडशे जातींचे बांबू पीक भारतात घेतले जाते़ पण बांबूचे उत्पादन करण्यासाठी मोजक्याच जातींच्या बांबूचा वापर केला जातो. पारंपरिक सण, उत्सवात आणि धार्मिक कार्यात बांबूच्या उत्पादनाला मागणी असते़ स्पर्धेच्या युगातही बांबूची उत्पादने टिकून आहेत. -अनिल पवार, विक्रेते.
......
काळानुसार बदल केला म्हणून व्यवसाय सुरू आहे
प्लॅस्टिक, फायबरच्या वस्तूंमुळे बांबूंपासून तयार होणाºया वस्तू उत्पादक आणि विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात आर्थिक परिणाम झाला आहे. पूर्वी भाजी बाजारात भाजी ठेवण्यासाठी वापरल्या जाणाºया बांबूंच्या टोपल्या दिवसाला शंभर विकल्या जात असे. सध्या भाजी बाजारात प्लॅस्टिकचे कॅरेट वापरले जात असल्यामुळे आठवड्याला फक्त दहा टोपल्या विकल्या जातात. आम्ही शोभेच्या व गृहसजावटीच्या वस्तू बनवल्यामुळे आमचा व्यवसाय सुरू आहे. -सोनाली मोरे, उत्पादक व विक्रेत्या.
...........