तिकीट निरीक्षकाच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगा पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:56+5:302021-07-04T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ तिकीट निरीक्षक यांच्या सतर्कतेमुळे एक हरवलेला अल्पवयीन मुलगा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ तिकीट निरीक्षक यांच्या सतर्कतेमुळे एक हरवलेला अल्पवयीन मुलगा पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. ही घटना २ जुलै रोजी पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये घडली.
वरिष्ठ तिकीट निरीक्षक राजेंद्र काटकर हे इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये ड्युटीवर होते. कल्याण स्थानक गेल्यावर त्यांना डबा क्रमांक D-८ मध्ये एकटा प्रवास करीत असलेला पाच वर्षीय मुलगा आढळून आला. त्याच्याजवळ बॅग होती. डब्यांतील उपस्थित प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर एका व्यक्तीने त्याला आणून बसवून सोडून गेला असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून राजेंद्र काटकर यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षला दिली. दादर स्थानक आल्यावर काटकर यांनी पुढील कार्यवाहीसाठी आरपीएफ जवान यांच्याकडे मुलाला सुपूर्द केले. दादर आरपीएफने याची दखल घेऊन पालकांची शोध घेण्यास सुरुवात केली. त्या मुलाच्या पालकाशी संपर्क साधून त्याना आरपीएफ ठाण्यात बोलविण्यात आले. कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्या मुलाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. राजेंद्र काटकर यांच्या कामचे कौतुक होत आहे.