गाव कारभाऱ्यांमुळे तोंडचे पाणी पळाले
By admin | Published: January 11, 2016 01:35 AM2016-01-11T01:35:43+5:302016-01-11T01:35:43+5:30
करंदी खे.बा. (ता. भोर) येथे पाणीपुरवठा योजनेसाठीे ४९ लाख खर्च करून गावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात गावाला यश आले
कापूरव्होळ : करंदी खे.बा. (ता. भोर) येथे पाणीपुरवठा योजनेसाठीे ४९ लाख खर्च करून गावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात गावाला यश आले. पण, करंदी खेबाच्या पाणीपुरवठा खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा झालेला नाही. त्यामुळे व पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा पगार न झाल्यामुळे गावचा सार्वजनिक पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे महिलांनी डोक्यावरून पाण्याचा हंडा आणताना नवीन वर्षाची गावाला ग्रामपंचायतीने भेट दिली असल्याची चर्चा विहिरीपासून ते गावच्या पारापर्यंत व घराघरांत रंगली. गावातील काही नागरिकांनी गावची पाणीपट्टी थकवल्यामुळे नळाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ज्या नागरिकांनी नियमितपणे गावच्या पाणीपट्ट्या भरल्या आहेत, अशा नागरिकांचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पट्टी भरणाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
गावातील काही धनदांडगे यांनी पिण्याच्या पाण्याचा वापर घराभोवताली बागायत करण्यासाठी करत असल्यामुळे गावचा नळ पाणी पुरवठा सध्या अडचणीचा झालेला आहे. शासनाने गावात पाणीपटटी वसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीला अनेक अधिकार देण्यात आलेले असताना अशा पध्दतीने पाणी पुरवठा अचानक बंद ठेवून नागरीकांना वेठीस धरले आह. या बाबत ग्रामपंचायत व ग्रामसेवक तसेच पाणी पुरवठा कर्मचारी यांची ही भूमिका नागरीकांना अडचण व अडवणूक निर्माण करणारी आहे. या बाबत गावातील महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीने गावात पाणी पटटी वसूल करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नसल्याचेही बोलले जात आहे.