नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जुन्नर तालुक्यातील तीन कृषिविक्री दुकानांचे परवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:07 PM2017-11-01T12:07:15+5:302017-11-01T12:12:39+5:30
जुन्नर तालुक्यातील तीन कृषिविक्री दुकानांचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी दिली.
पुणे : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे अनेक शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील तीन कृषिविक्री दुकानांचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी दिली आहे.
राज्य शासनाने बिगर नोंदणीकृत पीक वाढ संजीवकांची विक्री न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नारायणगावातील विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र, श्री प्रसाद कृषी सेवा केंद्र आणि बाविस्कर अॅग्रो दुकानांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ४५ कीटकनाशक केंद्रांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात ६ कीटकनाशक उत्पादक कंपनीवर कारवाई उत्पादनांवर विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत. अवैध कीटकनाशकांचा साठा केल्याप्रकरणी सन १९६८ आणि १९७१ अन्वये शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात आल्याचे खैरनार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध कीटकनाशकांच्या दुकानांमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यातील कीटकनाशकांचे उत्पादन साठवणुकीची तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. मोहिमेंतर्गत ३१ कीटकनाशक विक्रीवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्या कीटकनाशकांचे छापील मूल्य ६५, ४९ आणि ६६४ आहे.
कीटकनाशकांची विक्री करताना सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध सूत्र प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कीटकनाशकांची विक्री करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, कीटकनाशक वापरामुळे शेतकर्यांना आणि शेतमजुरांना विषबाधा होणार नाही.
याबाबतची दक्षता कृषी विक्री दुकानदारांनी घ्यावयाची आहे. तसेच संबंधित कीटकनाशकांची संपूर्ण माहिती शेतकर्यांना देणे बंधनकारक आहे.
अशी सूचना जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. विक्री केलेले कीटकनाशक, तसेच केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारसी केल्याव्यतिरिक्त जादा पिकाची लेबल शिफारस केली आहे.
कीटकनाशक मंडळाने दिलेल्या नोंदणी परवानगीचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.
.. तर परवाना निलंबनाची कारवाई
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कृषी अधिकार्यांना कीटकनाशकांची साठवणूक करणार्या दुकानदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्या दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.तसेच, कीटकनाशक फवारणी करताना शेतकर्यांनी घ्यावयाच्या आवश्यक काळजीच्या सूचना दुकानदारांनी देण्यासाठी सूचित करण्यात आले आहे, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी सांगितले.