लग्नसोहळ्यात होतेय अन्नाची नासाडी

By Admin | Published: May 29, 2017 02:38 AM2017-05-29T02:38:10+5:302017-05-29T02:38:10+5:30

लग्नसोहळ्यातील जेवणावळीचे स्वरुप बदलत चाललेले आहे. आता पंगतीची पारंपरिक पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफेने घेतली

Due to wedding, there is a loss of food | लग्नसोहळ्यात होतेय अन्नाची नासाडी

लग्नसोहळ्यात होतेय अन्नाची नासाडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : लग्नसोहळ्यातील जेवणावळीचे स्वरुप बदलत चाललेले आहे. आता पंगतीची पारंपरिक पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफेने घेतली आहे. ही पद्धतही काही वाईट नाही मात्र यातून गैरसमजामुळे निर्माण होत असलेल्या प्रकारामुळे अन्नाची नासाडी होत आहे. प्रगत समाजाची ओळख बनू पाहत असलेल्या या पद्धतीमुळे अन्न पूर्णब्रह्म चा विसर पडत आहे. कार्यक्रम आटोपल्यावर कार्यक्रम स्थळाच्या मागे वा जागा असेल तिथे अन्नाचे ढीग लावले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
हे अन्न फेकून याची विल्हेवाट लावली जाते. फेकलेले अन्न सडल्यामुळे त्यातून मिथेन या घातक वायूची निर्मिती होते. ग्लोबल वार्मिंग तसेच वातावरणातील बदलास ही नासाडी एका प्रकारे कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असे म्हणणाऱ्या भारत देशातच अनेकांना रात्री उपाशीपोटी झोपावे लागत आहे.
एका विवाह सोहळ्यात किमान २०० व्यक्ती जेवतील एवढे अन्न वाया जाते़ अशातही होणारी अन्नाची नासाडी ही त्याचा विपर्यास दर्शविणारी आहे. ताटातील उष्टे अन्न टाकून दिल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. अन्न उष्टे न टाकता योग्य वापर केल्यास अन्नपूर्णादेवीचा सन्मान होतो, हे समजणे गरजेचे आहे.


एका जेवणात १ हजार २३९ कॅलरीज असतात, जी कुपोषित बालकांच्या दिवसभराच्या ऊर्जेची गरज भागवू शकतात. मात्र लग्नातील प्रत्येक ताटातील २० टक्के जेवण म्हणजे २४६ कॅलरीज अन्न फेकून दिल्या जात आहे. अन्नाला देव म्हणविणाऱ्या भारतातच हा प्रकार सुरू असणे ही एक शोकांतीकाच ठरत आहे.
एका लग्न प्रसंगात सरासरी एक ते दोन हजार लोक हजर असतात. बुफे पद्धतीमुळे रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. प्रत्यक्षात ताटातील बरेचसे अन्न वाया जाते.


सर्व पदार्थांच्या अट्टाहासाने  अन्नाची नासाडी

लग्न समारंभ म्हणले की, त्यात जेवणावळी आल्याच. प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित करीत अनेक पदार्थांची रेलचेल असते, हे सर्व पदार्थ प्रत्येक जण इच्छा नसतानासुद्धा स्वत:च्या ताटात घेतो़ समारंभात गर्दी असल्याने नागरिक पुन्हा रांगेत लागण्याच्या भानगडीत न पडता एकाच वेळी पूर्ण प्लेट भरून घेतात.
बुफेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न घेतले गेल्याने ते त्यांच्या खाण्यात जात नाही. पर्यायी ते अन्न प्लेटमध्ये तसेच टाकण्यात येते. येथूनच अन्नाची नासाडी सुरू होते. जर आवश्यकतेनुसार अन्न घेतले तर ते वाया जाणार नाही, याची काळजी सर्वसामान्य नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Due to wedding, there is a loss of food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.