डेडलाइन डावलून रस्ते खोदाई सुरूच

By admin | Published: May 9, 2016 01:01 AM2016-05-09T01:01:25+5:302016-05-09T01:01:25+5:30

शहरामध्ये ३० एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची खोदाई होणार नाही असे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले असतानाही विविध भागांमध्ये खोदाई सुरूच आहे

Dug out the road from the deadline | डेडलाइन डावलून रस्ते खोदाई सुरूच

डेडलाइन डावलून रस्ते खोदाई सुरूच

Next

पुणे : शहरामध्ये ३० एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची खोदाई होणार नाही असे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले असतानाही विविध भागांमध्ये खोदाई सुरूच आहे. त्याचबरोबर खोदाईनंतरच्या दुरुस्तीची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या रखडलेल्या खोदाईमुळे नागरिकांचा मनस्ताप मात्र अद्यापही कायम आहे.
शहरामध्ये ३० एप्रिलनंतर मोबाईल कंपन्या, महावितरण, गॅस कंपनी यांच्याकडून कोठेही खोदाई होताना दिसल्यास संबंधित कंपनीने पालिकेकडे खोदाईसाठी जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जावी तसेच त्या कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा, असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार आयुक्तांनीही ३० एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची खोदाई होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
सेनापती बापट रस्त्यावरील मेरिएट हॉटेलजवळच्या मॉलसमोर रविवारी भर दिवसा ड्रेनेजच्या कामासाठी खोदाई सुरू होती. चतु:शृंगी मंदिराकडून सावित्रीबाई पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी एक छोटा रस्ता आहे. तिथे गेल्या ४ महिन्यांपासून पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदाई सुरू आहे. त्या कामाची मुदत संपली तरी ते अद्याप पूर्ण झाले नसून ३० एप्रिलनंतरही तिथे खोदाई सुरूच आहे. ही खोदाई थांबणार कधी आणि त्याच्या दुरुस्तीची कामे कधी केली जाणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी खोदाई झालेल्या कामाची दुरुस्ती प्रशासनाकडून पूर्ण केली जाणे अपेक्षित असते. मात्र दुरुस्तीची ही कामे प्रशासनाकडून खूपच संथगतीने सुरू आहेत.
खोदाईची कामे अपूर्ण राहिल्यास त्याचा मोठा त्रास पावसाळ्यामध्ये नागरिकांना सहन करावा लागेल. दत्तवाडी येथील रहिवासी पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले, ‘‘दत्तवाडी पोलीस स्टेशनसमोरच ३० एप्रिलनंतरही खोदाईची कामे सुरू आहेत. मोबाईल कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी ही खोदाई केली जात आहे. प्रशासनाकडून त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही?’’
शहरामध्ये ४ जी सेवा सुरू करण्यासाठी मोबाईल कंपन्या, गॅस कंपनी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी शेकडो किलोमीटर खोदाईसाठी परवानगी घेतलेली आहे. पावसाळा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ही खोदाई सुरू होणार आहे. नुकतेच बनविलेले रस्ते, फुटपाथ उखडून खोदाई होत असल्याने त्यावर महापौरांसह नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर खोदाईमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी समिती स्थापन केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dug out the road from the deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.