स्वर्णव चव्हाण अपहरण प्रकरणातील मोकाट अपहरणकर्त्याचे पुणे पोलिसांनाच आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 09:51 AM2022-02-10T09:51:26+5:302022-02-10T09:57:10+5:30

अपहरणकर्ताच जणू पोलिसांच्या मदतीला धावला!...

duggu swarnav chavan abduction case kidnappers challenge to pune police | स्वर्णव चव्हाण अपहरण प्रकरणातील मोकाट अपहरणकर्त्याचे पुणे पोलिसांनाच आव्हान

स्वर्णव चव्हाण अपहरण प्रकरणातील मोकाट अपहरणकर्त्याचे पुणे पोलिसांनाच आव्हान

googlenewsNext

पुणे: साडेतीनशे पोलीस अधिकाऱ्यांचे तपास पथक, शेकडो सीसीटीव्ही फूटेजची तपासणी काही हजार मोबाईल फोनचा डम डाटा काढल्याचे दावे केले जात असले तरी स्वर्णव चव्हाणच्या (swarnav chavan) मोकाट अपहरणकर्त्याने पुणेपोलिसांनाच आव्हान दिले आहे. स्वर्णवच्या अपहरणाला ११ फेब्रुवारी रोजी एक महिना पूर्ण होत आहे. मात्र, तांत्रिक तपासात अडकून खबऱ्यांच्या जाळ्याकडे (ह्युमन इंटेलिजन्स) दुर्लक्ष केल्यामुळेच पोलिसांना अपयश आल्याचे म्हटले जात आहे.

स्वर्णव चव्हाण या ४ वर्षांच्या बालकाचे ११ जानेवारी रोजी अपहरण झाले. तब्बल ९ दिवस त्याचा शोध लागला नव्हता. शेवटी अपहरणकर्ताच १९ जानेवारी रोजी दुपारी स्वर्णवला एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाजवळ सोडून गेला. अपहरणकर्त्याला पकडल्याशिवाय हा तपास थांबणार नाही. पुढील दोन दिवसात चांगली बातमी मिळेल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आता ११ फेब्रुवारीला अपहरणाला महिना पूर्ण १ होत आहे. अद्याप अपहरणकर्ता मोकाट फिरत आहे.

सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट-

पुनावळे येथे अपहरणकत्याने स्वर्णवला सोडले. तेथील लांबवरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे. तो स्वर्णवला पायी चालत घेऊन येत होता. परत जाताना तो चालत निवांतपणे जाताना दिसला. त्याने काळे जॅकेट घातले होते व मास्क लावलेला होता. त्यामुळे केवळ त्याची इतरांपेक्षा चालण्याची वेगळी पद्धत याशिवाय कोणताही धागा पोलिसांना उपलब्ध होऊ शकला नाही.

अपहरणकर्ताच जणू पोलिसांच्या मदतीला धावला!

सोशल मीडियावर या अपहरणाची खूप चर्चा होती. नऊ दिवस बालक सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. शेवटी १९ जानेवारी रोजी पुनावळे परिसरातील इमारतीच्या सुरक्षारक्षकाजवळ अपहरणकर्त्याने स्वर्णवला सोडले व १० मिनिटात परत येतो. असे सांगून तो गेला ते परत आला नाही. त्या बॅगेवर लावलेल्या चिठ्ठीवर त्याच्या वडिलांचा मोबाईल नंबर लिहिला होता. त्यावरून त्याचा शोध लागला.

स्वर्णव सतीश चव्हाण याचे शाळेत जात असताना एका अपहरणकर्त्यांनि दुचाकीवरून अपहरण केले होते. बालेवाडी बाणेर पोलीस चौकीपासून काही अंतरावर सकाळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला. पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांची मदत घेण्यात आली.

डुग्गूला दुचाकीवरून घेऊन जाताना एका सीसीटीव्हीमध्ये हा अपहरणकर्ता दिसून आला होता. त्यामुळे पोलिसांकडे किमान एक धागा होता. मात्र, त्यानंतर अपहरणकर्ता कोठेही दिसून आला नाही. तो चिखली येथे एका ठिकाणी आढळून आला होता. त्यानंतर त्याचा शोध घेण्याचा मार्ग खुंटला तो अजूनही खुंटलाच आहे.

अपहरण नेमके कशासाठी?

अपहरणकर्त्याबरोबर स्वर्णव तब्बल ८ दिवसांहून अधिक काळ सोबत होता. त्याला चांगले सांभाळले होते. त्याने खंडणीचीही मागणी केली नाही. त्याला सोडून देताना तो त्याच्या पालकांपर्यंत पोहोचेल, याची काळजी घेतली होती. आई-वडिलांकडे आल्यानंतरही तो अजूनही दादाकडे जायचे असे म्हणत असे. त्यामुळे त्याचे अपहरणकर्त्यांशी चांगले सूर जुळल्याचे दिसून येते. त्यामुळे नेमके अपहरण कशासाठी झाले, याचा अजून तपास लागू शकलेला नाही.

अपहरणकर्त्याविषयी अतिशय जुजबी माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आहे. तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून राहिल्याने मानवीय इंटेलिजन्स कमी पडल्याचे या प्रकरणात दिसून आले. या अपहरण प्रकरणात पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला; परंतु अजूनपर्यंत नेमके अपहरण कशासाठी झाले व अपहरण केले तर त्याला परत कशासाठी सोडले, याचे कोडेच अजून सुटले नाही. अप हरणकर्ता सापडल्याशिवाय हे कोडे सुटणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: duggu swarnav chavan abduction case kidnappers challenge to pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.