शहरात विधिवत घटस्थापना
By admin | Published: October 2, 2016 05:47 AM2016-10-02T05:47:24+5:302016-10-02T05:47:24+5:30
सनई-चौघड्याचे सूर... मंत्रोच्चारांचा घोष... अशा मंगलमय वातावरणात शहरात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. शहर व उपनगरांतील देवी मंदिरे
पुणे : सनई-चौघड्याचे सूर... मंत्रोच्चारांचा घोष... अशा मंगलमय वातावरणात शहरात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. शहर व उपनगरांतील देवी मंदिरे तसेच घरोघरी विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
शहरातील सर्व देवी मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली. बहुतेक देवी मंदिरे विद्युतरोषणाईने उजळून निघाली आहेत. शहरातील तांबडी जोगेश्वरी, चतु:शृंगी, महालक्ष्मी, भवानीमाता, वनदेवी, तळजाई, वाघजाई, शीतळादेवी अशा विविध मंदिरांमध्ये उत्साहात घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी देवीच्या मूर्ती मिरवणूक काढून उत्सव मंडपात घटस्थापना केली. त्यामुळे शहरात सर्वत्र मंगलमय वातावरण होते.
श्री देवी चतु:शृंगी मंदिरात अभिषेक, श्रीसूक्त, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण या कार्यक्रमांनंतर विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर देवीची महाआरती झाली. उत्सव काळात मंदिर २४ तास खुले राहणार आहे. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पीएन गाडगीळ ज्वेलर्सचे मालक सौरभ गाडगीळ व राधिका गाडगीळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
या वेळी प्राप्तिकर विभागाचे आयुक्त डी. एम. बेणुपानी,
मंदिराचे विश्वस्त भरत अगरवाल, तृप्ती अगरवाल, अॅड. प्रताप परदेशी, रमेश पाटोदिया, हेमंत अर्नाळकर, मुरली चौधरी, नारायण काबरा,
राजेश साकला, शिवा मंत्री आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन
आदिशक्तीला वंदन करणाऱ्या आणि कला, संस्कृती, नृत्य, गायन, वादन यांचा संगम असणाऱ्या नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, माजी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, गटनेते पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, पी. ए. इनामदार, अंकुश काकडे, पुणे महोत्सवाचे संयोजक व माजी उपमहापौर आबा बागुल, जयश्री बागुल, अभिनेत्री वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, श्वेता शिंदे, भार्गवी चिरमुले, गिरिजा जोशी, राधा सागर, गौरी नलावडे आदी उपस्थित होते.
मंदिराला फुलांची सजावट
शिवदर्शन येथील श्रीलक्ष्मी मंदिरात सकाळी सव्वाआठ वाजता माजी उपमहापौर आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त या मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. शहरातील सर्वच मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या दिवसभर रांगा लागल्या होत्या. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व मंदिरांमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.