लोणी पोलीस स्टेशन परिसरातील हॉटेल्समध्ये ‘दम मारो दम’; अनधिकृत हुक्क्याचा धूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:57 AM2023-12-18T10:57:12+5:302023-12-18T10:57:44+5:30
या अनधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधूून होत आहे...
- पंढरीनाथ नामुगडे
लोणी काळभोर (पुणे) : तरुणांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण हे फॅशन म्हणून अधिक आहे. दारू, सिगारेट, हुक्का, ड्रग्ज, तंबाखू, गुटखा यांचे प्रमाण चिंताजनक आहे. ग्रामीण भागातही याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरातील एका नामांकित शिक्षण संकुलाच्या परिसरात असलेल्या विविध हॉटेल्स आणि कॅफेमध्ये विनापरवाना हुक्क्याची सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी एन्जॉय म्हणून हुक्क्याच्या धुराचा झुरका मारून हुक्क्याच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. ‘हर्बल’च्या (वनऔषधींच्या) नावाखाली ‘दम मारो दम’च्या सुरात हुक्का पार्लरचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी या परिसरात तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. या अनधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधूून होत आहे.
अनेक हॉटेलमध्ये केवळ हर्बल हुक्का असल्याचे सांगून त्याऐवजी टोबॅकोची विक्री सुरू आहे. या ठिकाणी हुक्क्याची सिसा, हब्बल-बब्बल, हुक्कापेन आदी नावाने विक्री होत आहे. तसेच परिसरातील साध्या टपरीवरही हुक्का व त्याचे साहित्य उपलब्ध होत आहे. त्याबरोबर गांजा, एमडी, दारू अशा प्रकारचे हानिकारक अमली पदार्थ देखील विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत आहेत. या शिक्षण संकुलातील बरेच विद्यार्थी संकुलाबाहेर खासगी फ्लॅट घेऊन राहतात. परिसरातील अमली पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक या विद्यार्थ्यांबरोबर मैत्री करून त्यांच्यामार्फत व्यवसाय करत असल्याचे भयानक सत्य काही नागरिकांच्या समोर आले आहे. या सर्व अनधिकृत व्यवसायांवर अमली पदार्थविरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. हुक्क्याची क्रेझ युवा पिढीसह महिलांतही मोठ्या प्रमाणावर दिसते. तरुण-तरुणी हे व्यसन मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. याबाबत पोलिस प्रशासन याबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धूम्रपान, तंबाखूचे दुष्परिणाम -
- पुरुषांमध्ये नपुंसकता येण्याचा धोका
- कर्करोगाची शक्यता
- शारीरिक कमकुवतपणा येतो
- स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते
- गर्भपाताची शक्यता
- सहनशीलता ढासळते
- श्वसनाच्या आजारांना आमंत्रण
कारणे -
- पार्टी संस्कृतीचा वाढतोय प्रभाव
- उत्पादनांची सहज उपलब्धता
- पालक - पाल्यांमध्ये संवादाचा अभाव
- चित्रपट, मालिकांमधील व्यसनांचे उदात्तीकरण
- समाजात मिळणारी प्रतिष्ठा
- शासकीय यंत्रणांची कुचराई; जनजागृतीचा अभाव
लोणी स्टेशन परिसरातील बऱ्याच हॉटेलमध्ये विनापरवाना हुक्का विक्री सुरू आहे. ज्या ठिकाणी शिक्षण घेण्यास आलेली परराज्यातील विद्यार्थी हुक्का ओढत बसलेले दिसत असतात यांच्याकडे पाहून स्थानिक युवक देखील हुक्का ओढण्यास आकर्षित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने यावर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे करणार आहे.
- अभिजित बडदे, तंटामुक्ती अध्यक्ष, कदम वाकवस्ती