डमी उमेदवारांना मिळाली फक्त ३८१० मते
By admin | Published: October 20, 2014 12:15 AM2014-10-20T00:15:03+5:302014-10-20T00:15:03+5:30
डमी म्हणून उभ्या केलेल्या दोन जगताप, उबाळे, लांडगे यांना ३८१० मते पडली. अशा प्रकारे उमेदवार उभे करून राजकीय खेळी खेळणाऱ्यांचा डाव फसला
पिंपरी : डमी म्हणून उभ्या केलेल्या दोन जगताप, उबाळे, लांडगे यांना ३८१० मते पडली. अशा प्रकारे उमेदवार उभे करून राजकीय खेळी खेळणाऱ्यांचा डाव फसला असल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले.
प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते खाण्यासाठी डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जातात. नामसाधर्म्यामुळे उमेदवारांना अर्ज भऱ्याला लावलो जातो. त्याचा सर्व खर्च प्रतिस्पर्धी उमेदवार करतात. हे उमेदवार शहरात दिसत नाहीत. त्यांना शोधून आणून अर्ज भरला जातो. त्यासाठी त्यांना भरपूर पैसे दिले जातात. चिंचवड आणि भोसरी मतदार संघातही या वेळी चार डमी उमेदवार रिंगणात होते.
चिंचवडमधून भाजपची उमेदवारी मिळालेले आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे पूर्णपणे नामसाधर्म्य असलेले अन्य दोन लक्ष्मण पांडुरंग जगताप निवडणूक लढवत होते. त्यातील एका लक्ष्मण पांडुरंग जगताप यांना ५१८ आणि दुसऱ्या लक्ष्मण पांडुरंग जगताप यांना ८०८ मते मिळाली.
भोसरी मतदारसंघातही शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा रामभाऊ उबाळे यांचे नामसाधर्म्य असलेल्या सुलभा गणपती उबाळे या नावाने आणखी एका महिलेने अपक्ष म्हणून अर्ज सादर केला होता. या महिलेला ७०८ मते मिळाली. (प्रतिनिधी)