(डमी) ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:35+5:302021-03-21T04:09:35+5:30
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नऊ महिने ट्रॅव्हल्स व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू रुळावर येऊ लागला होता. सुमारे ५० टक्के ...
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नऊ महिने ट्रॅव्हल्स व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू रुळावर येऊ लागला होता. सुमारे ५० टक्के ट्रॅव्हल्स रस्त्यावर धावू लागल्या होत्या. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढल्याने ट्रॅव्हल्सला ब्रेक लागला असून, चाक पुन्हा पंक्चर झाल्यासारखी अवस्था झाली आहे.
लॉकडाऊन शिथिल होताच, सर्व सुरळीत होत आहे. त्यामुळे मूळ गावी गेलेले पुन्हा शहराकडे वळू लागले, तसेच परराज्यातून कामगार शहराकडे येत आहेत. यामुळे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येत होता. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने, तसेच लॉकडाऊनची भीती वाटू लागल्याने अनेक जण बाहेर पडण्यासाठी सावध पावले उचलू लागले आहेत, तसेच सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे पुन्हा ट्रॅव्हल्स व्यवसायिक चिंतेत पडले आहेत. वर्षभरात कोरोनामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक गणित जुळवणे अवघड होत आहे. आता कुठे बेरीज लागत असताना, मध्येच रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा कोंडीत सापडण्याची भीती वाटू लागली आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
* ३०० ते ३५०
कोरोना आधी रोज बाहेर जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या
५० ते ६०
सध्याची संख्या
-----------------
गाडी रुळावर येत होती पण .....
लॉकडाऊन शिथिल होताच प्रवाशी संख्या पूर्वपदावर येऊ लागली होती. अलीकडच्या काळात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गाडीचे हप्ते, कामगारांचा पगार या गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. तिकीट दरही कमी झाले आहेत. आता कुठे हिशोबाची गाडी रुळावर येत होती, पण गाड्याच थांबल्या असल्याने गणित बिघडू लागले आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले.
-----------------
शेतीचे कामे, सरकारी कामे, गावच्या जत्रा या निमित्ताने प्रवाशांची संख्या मोठी असायची. मात्र, गावच्या जत्रा बंद असल्याने प्रवाशी संख्या घटली आहे. रुग्ण वाढल्याने प्रवास करण्याचे टाळले जात आहे.
- ईश्वर माळी, व्यावसायिक
----------------
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी गर्दी मोठ्या प्रमाणात होती. आता मात्र घटली आहे. ज्या जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्या भागात गाड्या पाठविणे बंद केले आहे, तसेच राज्यात गाड्या धावण्याचे प्रमाण तुलनेने कमीच आहे.
- राजू पटेल, व्यावसायिक
होळीमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या असली, तरी तुलनेने कमीच आहे. कोरोनामुळे या व्यवसायात मंदीच आहे. परराज्यातील प्रवाशांची मोठी संख्या आहे. लॉकडाऊन पडेल या भीतीने, तसेच होळीमुळे ते गावी जात आहेत. रायपूर, इंदोर, लखनऊ, कानपूर, राजस्थान, भिलवाडा या भागात जाणारे प्रवाशी अधिक आहेत.
- मोहित शहा, व्यावसायिक