हॉकी स्टेडिअम बनले दारुड्याचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:27 AM2017-08-15T00:27:17+5:302017-08-15T00:27:21+5:30
हॉकीचे माहेरघर समजल्या जाणाºया खडकीतील हॉकी स्टेडिअम हे दारूड्यांचा आणि जुगाºयांचा अड्डा झाला आहे
खडकी : हॉकीचे माहेरघर समजल्या जाणाºया खडकीतील हॉकी स्टेडिअम हे दारूड्यांचा आणि जुगाºयांचा अड्डा झाला आहे, तर दुसरीकडे पोलीस आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड बघ्याची भूमिका घेत आहेत. दिवसाढवळ्या सर्रासपणे हॉकी स्टेडिअमच्या खोल्यांमध्ये गच्चीवर दारुडे आणि जुगारी यांची मैफल रंगू लागली आहे. याबद्दल खडकीतील खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने मोठ्या थाटात या स्टेडिअमचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते केले होते. त्या वेळी मुख्यमंत्री निधीतून फंडही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला मिळाला होता. त्या वेळीच खडकीतील हे स्टेडिअम अस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडिअम करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याकडे लक्ष दिले नाही. केवळ वर्षातून दोनदा या स्टेडिअममध्ये १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या सहयोगाने बोर्डातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानंतर बोर्डाचे अधिकारी या स्टेडिअममध्ये फिरकतही नाहीत.
सुरक्षारक्षक असूनही काही फायदा होत नाही. सुरक्षारक्षकांना दमदाटी करून मद्यपींनी स्टेडिअमला आपले आश्रयस्थान बनविले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांनीही अनेक वेळा पोलिसांत तक्रार करूनही पोलीस तेवढ्यापुरते येऊन जातात. त्या वेळी त्यांना कोणी सापडत नाही. त्यामुळे या हुल्लडबाजांचे चांगलेच फावले आहे, स्टेडियममध्ये मैदानात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असून, या ठिकाणी पूर्वी व्यायाम करण्यासाठी तरुण वर्ग येत होता. मात्र, या हुल्लडबाजांच्या दहशतीमुळे हे स्टेडिअम ओसाड पडलेले असते. एवढ्या मोठ्या वास्तूचा वापर दारूडे करीत असल्यामुळे खडकीतील नागरिकही नाराजी व्यक्त करतात. स्थानिक पोलिसांची या ठिकाणी कधीही फेरी होत नसल्याने या स्टेडिअमकडे खडकीकरांनी पाठ फिरवली आहे.
प्रेमी युगुलांचा वावर
स्टेडिअममध्ये अनेक वेळा महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना सापडले आहेत. शिक्षकांनी त्यांच्या पालकांना समज देऊन सोडले. मात्र, प्रेमी युगुल येथे दिसत असल्याने इतर विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. याकरिता पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील शिक्षकांनी लोकमतला सांगितले आहे.
लवकरच खडकी स्टेडियमचे नूतनीकरण, दुरुस्तीकरणाचे काम सुरू करून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात येईल. जेणेकरून येथील गैरप्रकारांना आळा बसेल. खडकी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल. स्टेडियम लवकरच खुले करण्यात येईल.
- अमोल जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी,
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड