'ड्युप्लिकेट सीएम' अडचणीत, गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलं स्पष्टीकरण म्हणाले...'तो मी नव्हेच!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:39 AM2022-09-20T10:39:48+5:302022-09-20T10:40:36+5:30

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे पुण्यातील विजय माने यांच्या विरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

Duplicate CM in trouble gave an explanation after filing a case claims Its not him | 'ड्युप्लिकेट सीएम' अडचणीत, गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलं स्पष्टीकरण म्हणाले...'तो मी नव्हेच!'

cm eknath shinde

googlenewsNext

पुणे-

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे पुण्यातील विजय माने यांच्या विरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत विजय माने यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शिंदेंसारखाच पोशाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर माने यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. यासंपूर्ण प्रकरणावर आता विजय माने यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. 

"मला माहित नसताना माझ्या नकळत फोटो काढले गेले असून पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे", असं विजय माने यांनी म्हटलं आहे. 

"मी सजग आणि सुशिक्षीत नागरिक आहे. तसंच भाजपा युवामोर्चाचा पदाधिकारी देखील आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होईल असं काम माझ्याकडून होणार नाही. काही मागण्यांसाठी पोलिसांना निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी एक व्यक्ती खुर्चीवर बसली होती. पण ते शरद मोहोळ आहेत याची कल्पना मला नव्हती. मी फक्त तिथं उपस्थित असलेल्या नेत्यांचं म्हणणं ऐकत उभा होतो. त्यावेळी कुणी माझा फोटो काढला आणि व्हायरल केला याची कल्पना नाही", असं विजय माने म्हणाले. 

तो मी नव्हेच!
ड्युप्लिकेट शिंदे अशी ओळख प्राप्त झालेल्या विजय माने यांनी सोशल मीडियात डान्स करतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ आपला नसल्याचंही यावेळी स्पष्ट केलं. "मुख्यमंत्री शिंदेंसारखे दिसणारे माझ्यासारखे आणखी काही लोक आहेत. फेटा घालून एक नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे तो माझा नाही. त्याव्हिडिओतील व्यक्ती मी नाही हे मी खुद्द मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनाही सांगितलं होतं. मी असलं काम करणार नाही. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम माझ्या हातून होणार नाही", असं विजय माने म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय?
विजय नंदकुमार माने याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने याने चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा आणि परिधान केलेलं व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट यामुळे ते शिंदे यांच्यासारखेच दिसत आहेत. त्याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आताही त्याने शिंदेंसारखाच पोशाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत फोटो सेशन केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. 

व्हॉटसॲप व फेसबुक या सोशल मीडियावर अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यावर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसला असल्याचे दिसत आहे. फोटो नीट पाहिल्यावर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून तो विजय माने याचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Web Title: Duplicate CM in trouble gave an explanation after filing a case claims Its not him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.