पनवेलमध्ये फसवणूक करुन पुण्यात पळून आलेल्या तोतया पोलिसाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:50 PM2022-04-12T14:50:29+5:302022-04-12T14:57:53+5:30
चारचाकी गाडी विकण्याचा बहाणा करुन पनवेलमध्ये फसवणूक केल्यावर तो पुण्यात येऊन लपून बसला होता
पुणे: चारचाकी गाडी विकण्याचा बहाणा करुन पनवेलमध्ये फसवणूक केल्यावर तो पुण्यात येऊन लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच त्याने आपण एपीआय असल्याचे बतावणी करुन पोलिसांना धक्काबुक्की केली. तू मला नाव पत्ता विचारणारा कोण असे म्हणून अरेरावी करणाऱ्या तोतया अधिकाऱ्यास पोलिसांनी पकडले. सिद्धेश्वर सुभाष नागरे (वय ३३, रा. पनवेल, रायगड, मुळ बुलढाणा) असे अटक केलेल्या या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सचिन पवार यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलमधील आनंद पाटील यांना नागरे याने १ लाख ५५ हजार रुपयांना कार विकण्याचा बहाणा केला. पाटील यांनी त्याला १ लाख ३० हजार रुपये दिले होते. मात्र, त्याने गाडी दिली नाही. त्यांनी पैशांची मागणी केल्यावर तो पळून पुण्यात लपून रहात होता. आनंद पाटील हे गाडीचा शोध घेत असताना त्यांना ती ओव्हाळवाडी येथे ती दिसली. त्यांनी गुन्हे शाखेला कळविले. पोलीस सोमवारी सकाळी तेथे गेले तेव्हा गाडीची नंबरप्लेट बनावट आढळली. गाडीमध्ये पोलीस अशी पाटी दिसली. पोलिसांनी वर श्री साई बिल्डिंगमध्ये गेले.जाऊन गाडी मालकाचे नाव विचारल्यावर त्याने तुम्ही मला नाव विचारणारे को. मी पुणे पोलीस दलामध्ये ए. पी. आय आहे, असे बाेलून पोलिसांना धक्काबुक्की केली. हा प्रकार सुरु असताना घरमालक तेथे आले. त्यांनी नागरे हा पोलीस असल्याचे सांगून त्याने खोली भाड्याने घेतली असून अजून भाडे दिले नाही, असे सांगितले. त्याला पोलिसांनी खाली घेऊन आल्यावर दोन भाजी विक्रेते आले. त्यांनीही पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे न देता भाजी घेऊन गेल्याचे सांगितले. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी ही कारवाई केली.