PMC | पुणे महापालिकेचा दुटप्पीपणा उघड; सार्वजनिक वाहतूकीचा आग्रह तर नव्या रस्त्याचाही घाट
By श्रीकिशन काळे | Published: April 11, 2023 01:36 PM2023-04-11T13:36:09+5:302023-04-11T13:44:17+5:30
नवीन रस्ता केला, तर त्यावरून खासगी वाहने जाऊन त्यातून प्रदूषण वाढणार नाही का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे...
पुणे : एकीकडे महापालिका प्रदूषण टाळा याची जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, यासाठी प्रयत्न करते आहे. पण दुसरीकडे वेताळ टेकडीला फोडण्यासाठी रस्ताही प्रस्तावित करत आहे. त्यामुळे महापालिका दुतोंडी वागत असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. नवीन रस्ता केला, तर त्यावरून खासगी वाहने जाऊन त्यातून प्रदूषण वाढणार नाही का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
पुणे महापालिका सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह असते. फेसबुक पेज, ट्विटर अकाऊंट यावर समाजजागृतीसाठी विविध पोस्ट करत असते. आजच ट्विटरवर महापालिकेच्या हँडलवर एक पीएमपी बच आणि पाच कारचे चित्र दाखवले आहे आणि त्याखाली एक की अनेक निर्णय आपला आहे, असे विचारले आहे. सार्वजनिक वाहनांचा वापर करा, प्रदूषण टाळा असे आवाहन त्यांनी केले आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. तेव्हा देखील त्यांनी सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी भर दिला होता.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्याने प्रदूषण कमी होऊन वाहतूक कोंडीही सुटते. परंतु, महापालिकेने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यांनी लॉ कॉलेज रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वेताळ टेकडीवरून बालभारती-पौड रस्ता प्रस्तावित केला आहे. त्यामुळे टेकडीचे नुकसान हाेणार आहे. तो रस्ता करून खासगी वाहनांचा प्रोत्साहन देण्याचेच काम महापालिका करत आहे, असा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. लॉ कॉलेज रोडवर जर सार्वजनिक वाहतूक सक्षम केली, तर त्या ठिकाणी सोय होऊन नवीन रस्ता करायची गरज पडणार नाही, पण त्याकडे दुर्लक्ष करून महापालिका नवीन रस्ता पुढे रेटत आहे. म्हणून नागरिकांनी या रस्त्याला विरोध दर्शविला आहे.