दुर्ग साहित्य संमेलन सिंहगडावर

By admin | Published: February 19, 2015 11:34 PM2015-02-19T23:34:38+5:302015-02-19T23:34:38+5:30

गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजिल्या जाणाऱ्या दुर्ग साहित्य संमेलनाचे पाचवे पुष्प यंदा २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान सिंहगड किल्ल्यावर गुंफले जाणार आहे.

Durg Sahitya Sammelan Sinhagada | दुर्ग साहित्य संमेलन सिंहगडावर

दुर्ग साहित्य संमेलन सिंहगडावर

Next

पुणे : गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजिल्या जाणाऱ्या दुर्ग साहित्य संमेलनाचे पाचवे पुष्प यंदा २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान सिंहगड किल्ल्यावर गुंफले जाणार आहे. यानिमित्ताने दुर्गविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर संमेलनाचे अध्यक्ष आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निमंत्रक आणि ज्येष्ठ दुर्गयात्री जयप्रकाश सुराणा स्वागताध्यक्ष आहेत. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते २० फेब्रुवारी राजी या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या नावाने त्यांच्या प्रियजनांकडून ‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळा’ची स्थापना करण्यात आलेली आहे. मंडळातर्फे दरवर्षी एका किल्ल्याच्या सान्निध्यात ‘दुर्ग साहित्य संमेलन’ भरवले जाते. यापूर्वी राजमाची, कर्नाळा, विजयदुर्ग आणि सज्जनगड या किल्ल्यांवर संमेलने झाली आहेत.
या तीनदिवसीय सोहळ्यात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, समारोप सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संमेलनात दुर्ग आणि निसर्ग (सहभाग - डॉ. श्रीकांत इंगळहळ्ळीकर, डॉ. आनंद पाध्ये, डॉ. सतीश पांडे, डॉ. हेमंत घाटे) आणि दुर्ग आणि शिल्प (सहभाग - महेश तेंडुलकर, सदाशिव टेटविलकर, डॉ. गो. ब. देगलूरकर) या दोन विषयांवर परिसंवाद रंगणार आहेत.
पन्नास वर्षापूर्वी झालेल्या ‘दहा दिवस दहा दुर्ग’ या मोहिमेतील सहभागी ज्येष्ठ दुर्गरोहींशी आणि सिंहगडाचे वारस’ या विषयांतर्गत नरवीर तानाजी मालुसरे, नावजी बलकवडे आणि लोकमान्य टिळक यांच्या वंशजांशी चर्चेचे खास कार्यक्रम आहेत. दरवर्षी दुर्ग साहित्य संमेलनामध्ये गोनीदांच्या दुर्गविषयक एका कादंबरीचे त्यांचे कुटुंबीय अभिवाचन करतात.
यंदाच्या गोनीदांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’ या कादंबरीचे अभिवाचन केले जाणार आहे. डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव आणि रुचिर कुलकर्णी सहभागी होणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दुर्गविषयक मुलाखत हे यंदाच्या संमेलनाचे खास आकर्षण आहे. तसेच ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे ‘छत्रपती शिवाजीमहाराजांचे गनिमी काव्याचे युद्ध’ विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.
संमेलनाच्यानिमित्ताने दुर्गविषयक छायाचित्र, चित्रकला, सिंहगड चढणे आणि दुर्गविषयक प्रश्नमंजूषा आदी स्पर्धा, तसेच पुरंदर ते सिंहगड अश्वारोहण मोहिमेचे आयोजन केले आहे. याशिवाय संमेलनस्थळी सह्याद्रीवरील चित्र-छायाचित्र आणि गिर्यारोहणातील साहित्यावर आधारित अशी तीन प्रदर्शने भरविली आहेत.
पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमीचे कलाकार संमेलनस्थळी गडदुर्गांवर रांगोळ्या काढणार
आहेत. दुर्गअभ्यासक शिल्पा
परब-प्रधान यांच्याबरोबर
सिंहगड दर्शन, नवोदित लेखकांचा मेळावा, दुर्गविषयक माहितीपटांचे सादरीकरण आकर्षण आहे. या संमेलनाच्या निमित्ताने ‘सिंहगड’ या विषयावरील विशेषांकाचे प्रकाशनही या वेळी करण्यात येणार
आहे. (प्रतिनिधी)

सदाशिव टेटविलकर यांना पुरस्कार
४दुर्ग साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने दरवर्षी दिला जाणारा ‘दुर्ग साहित्य पुरस्कार’ यंदा ठाण्याचे ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांना जाहीर झाला आहे. रोख ११ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. टेटविलकर यांनी महाराष्ट्रातील गडकोट आणि अन्य ऐतिहासिक स्थळांवर प्रदीर्घ लेखन केले आहे. त्यांची ‘गडकिल्ल्यांच्या जावे गावा’, ‘दुर्गयात्री’, ‘दुर्गसंपदा ठाण्याची’, ‘ठाणे किल्ला’, ‘विखुरल्या इतिहास खुणा’, ‘दुर्गलेणी दीव, दमण, गोव्याची’, ‘महाराष्ट्रातील वीरगळ’ आदी पुस्तके प्रकाशित आहेत.

Web Title: Durg Sahitya Sammelan Sinhagada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.