उरुळी कांचनमध्ये डेंगीच्या रुग्णांत वाढ
By admin | Published: November 15, 2015 12:46 AM2015-11-15T00:46:01+5:302015-11-15T00:46:01+5:30
उरुळी कांचन परिसरात डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे़ मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे परिसरातील नागरिकांची डेंगीच्या आजाराची
उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे़ मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे परिसरातील नागरिकांची डेंगीच्या आजाराची भीती दाखवून खाजगी दवाखाने, रुग्णालये व रक्त लघवी तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा अवाच्या सवा आकारणी करून करीत असलेल्या लुबाडणुक करीत आहेत़ या च्या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीय उरुळी कांचन बंदचे आयोजन करण्यात आले आहे़
राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व सर्व स्तरावरील आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ गावातील राममंदिरापासून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे़ हा मोर्चा संपूर्ण गावातून फिरुन ग्रामपंचायत कार्यालयाजवळ येईल़ तेथे निषेध सभा होऊन ठप्प प्रशासनाविरुद्ध आवाज उठविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे यांनी दिली.
उरुळी कांचन गावात डेंगीसदृश्य रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून घरटी किमान एक तरी व्यक्ती या रोगाने बाधीत झाली आहे़ घाणीचे साम्राज्य व पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाईमुळे उरुळी कांचन येथे डेंगीचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की आज दुपारी मला याबाबतची माहिती मिळाली आहे, या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो असून तातडीने सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावण्याचे आदेश दिले आहेत.
डेंगी या जीवघेण्या आजाराचे रुग्ण उरुळी कांचन मधील तुपे वस्ती, डाळिंब रोड, आश्रम रोड व गावाचा मध्यवर्ती भाग व महात्मा गांधी विद्यालय रस्ता अशा परिसरात झपाट्याने वाढत आहेत मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रशासन कासव गतीने चालत असून यावरील तातडीच्या उपाय योजना करण्यात अपयशी ठरल्याची खंत माजी सरपंच दत्तात्रय कांचन यांनी व्यक्त केली आहे़