भरदिवसा जेसीबी लावून विजेचे खांब व तारा चोरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:53+5:302021-08-26T04:14:53+5:30
दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील पूर येथे दोन वर्षांपूर्वी उभे केलेले खांब जेसीबीच्या साहाय्याने उखडून आणि कामगार लावून ...
दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील पूर येथे दोन वर्षांपूर्वी उभे केलेले खांब जेसीबीच्या साहाय्याने उखडून आणि कामगार लावून तेथील विद्युत तारा भरदिवसा एकाने लंपास केल्या. सुमारे अडीच लाखांचा ऐवज त्यांनी अशा पध्दतीने लंपास केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुरमधील गावाजवळ शेतकऱ्यांना वीज पंपासाठी पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा व्हावा म्हणून नवीन ट्रान्सफाॅर्मर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार इन्फ्रा योजनेअंतर्गत नवीन रोहित्रसाठी सन २०१८-१९ मध्ये ही लाईन टाकण्यात आली होती. ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध झाला नाही म्हणून खांबावरील तारा विद्युत प्रवाहाला जोडलेल्या नव्हत्या. कनेरसर येथील आणि परिचित असलेला व्यक्ती हे खांब व तारा काढून घेत असल्याचे काही जणांना निदर्शनास आले. यावेळी येथे असलेल्या एका ग्रामस्थाने हटकले असता महावितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार हे काम केल्याचे या व्यक्तीने सांगितले व सर्व साहित्य वाहनात भरून तो निघून गेला.
गावातील ग्रामस्थांना ही माहिती मिळाली मिळाल्यावर ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांनी मोबाईलद्वारे महावितरण अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र कोणालाच खांब व तारा नेण्याची सूचना दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलीस पाटील राहुल ताम्हाणे व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा केला. चोरीला गेलेल्या साहित्याबद्दल महावितरण कंपनीच्या राजगुरूनगर कार्यालयात चौकशी करण्याचे व कारवाईचे पत्र पोलिस पाटील राहुल ताम्हाणे, सरपंच प्रतिभा गावडे, उपसरपंच नामदेव गावडे, सदस्य किशोर सावंत, किरण गावडे, श्रीनिवास गावडे यांनी दिले आहे.
पावसाळ्यात शेतातील कामे कमी असल्याने परिसरात फारसे कोणी जात नाही. लाईन बंद व वापरात नाही. या स्थितीचा फायदा घेऊन संबंधित व्यक्तीने भर दिवसा क्रेन, माणसे अशी यंत्रणा लाऊन जमिनीत रोवलेले खांब उखडले. त्याला जोडलेली सर्व साहित्य सामग्री घेऊन पोबारा केला. महावितरण कंपनीच्या एका अधिकाऱ्याने पडद्याआडून सहकार्य केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना व माहिती न देता केलेल्या या कृत्यावरून या व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार देणार असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
--
कोट
ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध न झाल्यामुळे ही लाईन दोन वर्षांपासून बंद होती. कोणत्याही प्रकारचा आदेश नसताना पुर येथे उभे केलेले खांब, त्यावरील तारा आणि इतर साहित्य परस्पर काढून नेण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांना पोलिसांत चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.
संतोष तळपे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, राजगुरूनगर