जिल्हाबंदी दरम्यान नीरा पोलिसांची व नागरिकांची तू...तू.. मैं..मैं.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:02+5:302021-04-24T04:11:02+5:30
-- नीरा : जिल्हाबंदीच्या आदेशानुसार नीरा (ता. पुरंदर) येथील पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांना बॅरिकेड लावून चौकशी करत ...
--
नीरा : जिल्हाबंदीच्या आदेशानुसार नीरा (ता. पुरंदर) येथील पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांना बॅरिकेड लावून चौकशी करत आहेत. वाहनचालकांनी योग्य कारण न सांगितल्यास त्यांना परत पिटाळले जात आहे. नीरा व लोणंद दरम्यानच्या गावातील लोकांची दररोज शेतीसह वेगवेगळ्या कारणाने ये - जा असते. आत जिल्हाबंदीमुळे या लोकांना ये-जा करतेवेळी पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत. यातून तू...तू. मैं.. मैं. होत आहे.
राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत मिनी लॉकडाऊन करण्याच्या सूचना दिल्यानंतरही लोकांचा संचार काही केल्या कमी होताना दिसून येत नव्हता. लोक अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या कारणाने भटकत होती. गुरुवारी रात्री आठ नंतर जिल्हा संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी सकाळीच नीरा पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना रोखून धरत चौकशी केल्यावर सबळ कारण असल्यास सोडले किंवा सबळ कारण नसल्यास माघारी पाठवले लावले.
नीरा (ता.पुरंदर) हे गाव पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. नीरा नदी ओलंडल्यावर सातारा जिल्हा हद्द लागते. सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक कामाधंद्या निमित्त ये-जा करत असतात. नीरेतील बऱ्याच लोकांची शेती खंडाळा तालुक्यातील गावांमध्ये आहे. तर काही दूध व्यावसायिक दूध घालण्यासाठी नीरा गावात येत असतात. या दरम्यान लोक पोलिसांशी पंगा घेत होते, तर काही लोक विनंती करत निघून जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस मात्र दिवसभर उन्हातान्हात पोळत होते. कडक उन्हात ज्येष्ठ पोलिसांना त्रास होत होता. भर उन्हात बंदोस्तातील पोलीस पहिल्याच दिवशी मेटाकुटीला आले होते. पण, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याशिवाय पर्यायच नसल्याचे ज्येष्ठ पोलीस कर्मचारी बोलून दाखवत होते.
--
फोटो क्रमांक : २३नीरा जिल्हाबंधी तू...तू.. मैं..मै
फोटोओळ : पुणे सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीच्या काठावर नीरा पोलिसांनी बॅरिकेड लावून दिवसभर वाहनांची चौकशी केली.