दिवाळीत पुणे विभागात १९ लाख प्रवाशांनी घेतला 'लालपरी'चा लाभ, विक्रमी २३ कोटींचे उत्पन्न
By अजित घस्ते | Published: November 30, 2023 02:57 PM2023-11-30T14:57:24+5:302023-11-30T15:00:31+5:30
प्रवाशांकडून लांब पल्ल्याचा प्रवास करताना स्लीपर बसला प्राधान्य दिले आहे....
पुणे : दिवाळीत गावी जाऊन सण साजरा करण्याची हौस वेगळीच असते. त्यामुळे दिवाळीच्या काळात गावी जाण्यासाठी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वाहनाचा वापर करून जाण्यासाठी प्राधान्य देतात. पुण्यात राज्य आणि राज्याबाहेरील राहणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. दरवर्षीपेक्षा यंदा दिवाळीत लालपरीतून दिवाळीच्या काळात प्रवास करणायांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. (दि. ९ ते २०) या बारा दिवसांत पुणे विभागातून १८ लाख ८७ हजार ६५२ नागरिकांनी एसटीतून प्रवास केला आहे. त्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या शिवाई, शिवशाही, शिवनेरी, हिरकणी अशा विविध प्रकारच्या बसेस आहेत. प्रवाशांकडून लांबपल्ल्याचा प्रवास करताना स्लीपर बसला प्राधान्य दिले आहे.
पुणे विभागातून राज्यातील सर्व भागात जादा गाड्या सोडण्यात आले होत्या. त्यात प्रवाशांना देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर विनासवलत प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त होती. यंदा दिवाळीत १२ दिवसांत १८ लाख ८७ हजार ६५२ प्रवाशांनी प्रवास केला असून, पुणे विभागातील एसटीचे ३६ लाख ५९ हजार १५३ किमीचा प्रवास केला आहे. त्यातून एसटीला २३ कोटी २३ लाख ९८ हजार १५३ इतके उत्पन्न पुणे विभागाला मिळाले आहे. दरवर्षीपेक्षा यंदाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला या कसरत करण्याची वेळ आली होती. यामुळे या काळात काही वेळा बाहेरील आगारातून गाड्यांची संख्या वाढवून प्रवाशांना सेवा दिली यामुळे यंदा एसटीला प्रवाशांनी जादा पसंती दिले असल्याचे स्पष्ट होते.
एसटी आरक्षणाला पसंती -
दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन आरक्षण करुन प्रवास करणा-याचे प्रमाण वाढत आहे. यंदा दिवाळीत राज्यातून ५ लाखांहून अधिक नागरिकांनी तिकीट आरक्षण करून प्रवास केला. त्यात सर्वाधिक पुणे विभागातून ३६ हजार ८४१ नागरिकांनी तिकीट आरक्षण करुन एसटीच्या विविध बसने प्रवास केला आहे.