दिवाळीत सुकामेवाची ऑन लाईनला चलती; सुकामेवा झाला स्वस्त; उत्पादन आणि आवक वाढली
By अजित घस्ते | Published: November 6, 2023 06:16 PM2023-11-06T18:16:25+5:302023-11-06T18:17:08+5:30
बदाम, काजू, मनुके, जर्दाळू, अक्रोड, मनुका, जर्दाळूच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याने दर घटले
पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोड धोड खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सुकामेवाचा वापर केला जातो. बाजारात सुकामेवाला मागणी अधिक वाढली आहे. तर यंदा जगभरात बहुतांशी सुकामेव्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. उत्पादन आणि आवक वाढल्याने बहुतांशी सुकामेव्याच्या दरात यंदा १५ ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. बदाम, काजू, मनुके, जर्दाळू, अक्रोड, मनुका, जर्दाळूच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याने दर घटले आहेत. सुकामेव्याचे दर कमी झाल्याचा फायदा येणाऱ्या दिवाळीत सर्वसामान्यांना होत आहे. त्याचबरोबर ग्राहक दुकानातील खरेदी बरोबर ऑन लाईन खरेदीकडे जादा पसंती देत आहेत. यामुळे यंदा दिवाळीत सुकामेवाची ऑन लाईन खरेदीची चलती जोरात सुरू आहे.
सुकामेव्याचे बॉक्स खरेदीवर भर
यंदा परवडणाऱ्या किंमतीत सुका मेवा खरेदी करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी पेक्षा दिवाळीनिमित्त संस्था, संघटना, कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सुकामेवा देत आहेत. बाजारात सध्या विविध प्रकारच्या सुट्ट्या आणि पॅकींग सुकामेव्याला मागणी वाढत आहे. यंदा प्रत्यक्ष दिवाळीला सुरूवात झाली असून लोकांचा सुकामेवा खरेदीवर भर वाढला आहे. आता कॉर्पोरेट क्षेत्रातही तसेच मित्र आणि नातेवाईकही एकमेकांना मोठ्या प्रमाणात दिवाळी भेट देत असतात.सुकामेव्याचे बॉक्स भेट स्वरूपात देण्याचा कल देखील वाढला आहे.
सुकामेव्याचे दर
ड्रायफु्टसचे प्रतिकिलोचे भाव
वस्तुचे नाव -- नोव्हेंबर २०२३ २०२२ नोव्हेबर
काजू -- ६०० -८०० ७८० ते ९००
खारीक -- १२५-३०० २५० ते ३५०
अक्रोड -- ८००-१००० ८०० ते १२००
बदाम --५५०- ८०० ८०० ते १२००
अंजीर -- ७००-१५०० ८०० ते १६००
बेदाणा -- १५०-२५० २५० ते ३५०
खारा पिस्ता -- ९००-१२०० १००० ते १५००
जर्दाळू -- २००-४०० ४०० ते ८००
बाजारात सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारात अवाक जास्त आहे. तसेच यंदा हवामान चांगले असल्याने उत्पादनही मोठ्या प्रमाणावर निघाले आहे. त्यामुळे सुकामेव्याचे दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर सध्या सुकामेव्याचे बॉक्स खरेदीवर भर ग्राहकांचा भर वाढला आहे. दर कमी झाल्याने यंदा सुकामेवाला अधिक मागणी वाढली आहे.-नविन गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड