आचारसंहितेच्या काळात ‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 03:19 AM2019-03-14T03:19:45+5:302019-03-14T03:20:06+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या काळात ‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पुणे : आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय अधिकारी, पदाधिकारी यांच्याकडून घेतले जाणारे लोकशाही दिन, तक्रार निवारण कार्यक्रम तत्काळ स्थगित केले जातात. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या काळात ‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमामुळे आचारसंहिताभंग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न अथवा सूचना ऐकून घेण्यासाठी विद्यावाणी रेडिओ केंद्राच्या माध्यमातून ‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’ हा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमासाठी येत्या १२ मार्च ते १७ मार्च २०१९ या कालावधीत विद्यार्थ्यांकडून प्रश्न मागविण्यात आले आहेत. त्याला त्यानंतर कुलगुरूंकडून विद्यावाणी रेडिओ केंद्रावरून उत्तरे दिली जाणार आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली असल्याने हा कार्यक्रम अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याकडून लोकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी घेतले जाणारे लोकशाही दिन, तक्रार निवारण दिन असे कार्यक्रम तात्काळ स्थगित केले जातात. विद्यापीठाचे कुलगुरू देखील शासकीय यंत्रणेचा एक भाग असल्याने त्यांना देखील याच स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही असे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
‘प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे’ हा कार्यक्रम जर आचारसंहितेच्या नियमांमध्ये बसत नसेल तर तो प्रशासनाकडून घेतला जाणार नाही, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माध्यम समन्वयक अभिजित घोरपडे यांनी स्पष्ट केले.